राष्ट्रीय सहकार धोरण उच्चस्तरीय समितीत राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांची निवड
राष्ट्रीय सहकार धोरण उच्चस्तरीय समितीत राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांची निवड

कोपरगाव विजय कापसे दि ९ ऑक्टोबर २०२५ : भारत सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या आदेशान्वये महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय सहकार धोरण २०२५ जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यांनी जानेवारी २०२६ पूर्वी आपल्या राज्यस्तरीय सहकार धोरणांची आखणी करणे आवश्यक आहे. यासाठी केंद्र सहकार मंत्री अमित शहा यांच्या सूचनेनुसार गठीत झालेल्या उच्चस्तरीय समितीत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांची निवड करण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक माहिती देताना अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, “सहकार से समृद्धी” या केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या संकल्पनेनुसार सहकार क्षेत्राच्या माध्यमातून भारताच्या जीडीपी वाढीमध्ये कसा हातभार लावता येईल ? यावर ही समिती काम करणार आहे. सहकारी संस्थांमधील परस्पर सहकार्य वाढविणे, देशभरातील विविध राज्यातील सहकारी संस्थांचा कायदा व कार्यपद्धती याचा अभ्यास करून ही समिती केंद्र शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे. तसेच सहकार क्षेत्रात सहकारातील तंत्रज्ञानातील तज्ञांशी चर्चा करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे. याबाबत केंद्र व राज्य शासन सहकार खात्याला योग्य ते बदल सुचविणार आहे.

जगभरात आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे होत असताना महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद आयोजित केली होती. या सहकार परिषदेला १६ देशातील प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेच्या यशस्वी नियोजनासाठी राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे यांनी राज्यभर झंझावाती दौरे करून सहकार दिंडीच्या माध्यमातून राज्यातील सहकारी पतसंस्थांमध्ये नवचैतन्य, उत्साह निर्माण केला. शिर्डी येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला राज्यातील १२ हजाराच्या वर सहकारी पतसंस्था चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.अशा विशेष उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन केंद्र शासनाकडून ही निवड झाली असल्याचे राज्य फेडरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.सुरेखा लवांडे यांनी सांगितले.





