के.जे. सोमैया महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा दिन’
के.जे. सोमैया महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा दिन’
के.जे. सोमैया महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा दिन’

कोपरगाव विजय कापसे दि ८ ऑक्टोबर २०२५– मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही समस्त मराठी जणांसाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. मराठी भाषा आणि साहित्य याचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि गौरवशाली असा असल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे आवश्यकच होते. विद्यार्थ्यांनी आपल्या मराठीचे सखोल ज्ञान प्राप्त करणे आणि बारकावे समजून घेणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ ग्रामीण कवी लक्ष्मण बारहाते यांनी येथे केले. स्थानिक के.जे. सोमैया महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने आयोजित ‘अभिजात मराठी भाषा दिन’ समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बारहाते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे होते.

याप्रसंगी श्री. बाराहाते यांनी मराठी भाषेतील शब्द, वाक्य, वाक्प्रचार, म्हणी आदी बारकावे विद्यार्थ्यांना समजावून सांगत त्याचे वाचन, चिंतन, मनन आणि कृती केले पाहिजे असेही सांगितले. त्याचबरोबर त्यांनी आपल्या ‘वाटून खावा घास’, ‘शब्द’ आदी कविता सादर करून उपस्थितांनी मने जिंकली.

अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही अत्यंत स्वागतयोग्य व अभिमानाची बाब आहे. दैनंदिन जीवनाबरोबरच स्पर्धा परीक्षांमध्ये देखील भाषा अत्यंत महत्त्वाची आहे, परंतु अलीकडे विद्यार्थ्यांमध्ये दिसून येणारी अनास्था आणि उदासीनता चिंताजनक आहे. पदवीधर होऊन नोकरी मिळत नाही अशी ओरड करण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी गंभीर होऊन मातृभाषा मराठीचे ज्ञान गांभीर्याने संपादन करून ते कृतीत उतरविल्यास रोजगाराचे दरवाजे आपोआप उघडतील.”
याप्रसंगी हिंदी विभाग प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे, वाणिज्य शाखेचे डॉ. संजय अरगडे, डॉ. रवींद्र जाधव यांची विशेष उपस्थिती होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. संपत आहेर यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. विनोद शिनगारे यांनी केले. प्रा. नवनाथ वैद्य यांनी उपस्थितांचे आभार मानले. प्रा. अमोल बंद्रे, प्रा. प्रवीण मोरे, प्रा. अमोल चिने, प्रा. किरण सोळसे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.



