आपला जिल्हा

पुणे – नाशिक रेल्वे मार्गासाठी जनआंदोलनाची अपरिहार्यता 

पुणे – नाशिक रेल्वे मार्गासाठी जनआंदोलनाची अपरिहार्यता 
पुणे – नाशिक रेल्वे मार्गासाठी जनआंदोलनाची अपरिहार्यता 
संगमनेर प्रतिनिधी दि ५ डिसेंबर २०२५नाशिक – पुणे रेल्वे हा केवळ एक परिवहन प्रकल्प नाही ; तो उत्तर महाराष्ट्र, अकोले–संगमनेर–सिन्नर पट्टा आणि पुणे महानगराच्या आर्थिक-सामाजिक रक्तवाहिन्यांना जोडणारा विकासाचा कणा आहे. गेल्या काही वर्षांत रेल्वे विभागाने नाशिक–सिन्नर–संगमनेर–आळेफाटा–नारायणगाव–मंचर–राजगुरुनगर–चाकण–पुणे हा सर्वे झालेला, भूअधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असलेला मार्ग ठरवला होता. या मार्गावरून जाणाऱ्या रेल्वेने औद्योगिक वाहतूक, कृषी उत्पादनांची निर्यात, शैक्षणिक-आरोग्य सुविधा, तसेच नागरिकांच्या प्रवासाला अभूतपूर्व वेग मिळाला असता.

जाहिरात

मात्र संसदेतील नव्या घोषणेनुसार रेल्वेमंत्री अश्विनी कुमार यांनी नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर–चाकण–पुणे असा पूर्णपणे वेगळा मार्ग काही “तांत्रिक कारण” दाखवत जाहीर केला. विशेषतः नारायणगाव परिसरातील GMRT (Giant Metrewave Radio Telescope) संशोधन केंद्राच्या तांत्रिक अडचणी दाखवत मूळ ठरवलेला मार्गच बदलण्यात आला. पण प्रश्न असा आहे की ही अडचण खरोखरच तांत्रिक अडचण आहे की कोणाच्या राजकीय सोयीचा बहाणा?

जाहिरात

मूळ मार्गच सर्वाधिक उपयुक्त का ?

1. संगमनेर–पुणे मार्ग हा देशातील सर्वाधिक गर्दीचा राज्य मार्ग – दररोज लाखो प्रवासी; 5–7 तास लागणारा अवघड प्रवास.

2. चाकण MIDC देशातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक पट्ट्यांपैकी एक – येथून नाशिक, सिन्नर, अकोले, संगमनेरकडे जाणाऱ्या वाहतुकीची भीषण कोंडी. वैताग आणि मनस्ताप सहन करायला लावणारी.

3. उत्तर महाराष्ट्र ते पश्चिम महाराष्ट्र या दोन मोठ्या आर्थिक पट्ट्यांना जोडणारा हा पर्याय सर्वात तर्कसंगत.

4. सर्वेक्षण पूर्ण, जमीन अधिग्रहणाची प्राथमिक प्रक्रिया सुरू, DPR (Detailed Project Report) तयार म्हणजे सरकारी यंत्रणेचे वर्षानुवर्षांचे श्रम वाया घालवण्याचा प्रयत्न.

सध्याचा नवा जाहीर केलेला पर्याय नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेला, तर अकोले–संगमनेर–नारायणगाव–मंचर–राजगुरुनगर–चाकण हा संपूर्ण पट्टा विकासाच्या मुख्य प्रवाहापासून पुन्हा मागे पडेल.

जाहिरात

खासदार अमोल कोल्हे आणि आमदार सत्याजित तांबे यांची भूमिका…

खासदार अमोल कोल्हे यांनी मुद्दा लोकसभेत मांडला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे #आमदार_सत्यजित_तांबे यांनी या प्रकरणात अत्यंत स्पष्ट, आक्रमक आणि तर्कशुद्ध भूमिका मांडली आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे नाशिक–सिन्नर–अकोले–संगमनेर–नारायणगाव–चाकण–पुणे या सर्व मतदारसंघातील आमदार–खासदारांनी एकमुखाने उचलून धरण्याची वेळ आली आहे. हा प्रश्न केवळ मार्गाचा नाही—हा प्रश्न पुढच्या 50 वर्षांच्या विकासाच्या नव्या दिशेचादेखील आहे.

आता जनतेने गप्प बसून चालणार नाही..!

या भागातील जनता रोजच्या रोज वाहतुकीच्या नरकयातना भोगते आहे. उद्योग, शिक्षण, शेती, आरोग्य—प्रत्येक क्षेत्राला या रेल्वेमुळे नवा श्वास मिळाला असता.

म्हणूनच या मार्गासाठी आता मोठ्या जनआंदोलनाची अपरिहार्यता निर्माण झाली आहे.

नाशिकच्या तपोवनातील झाडतोड रोखण्यासाठी जशी पर्यायी, सर्जनशील, व्यापक लोकचळवळ उभी राहिली, तशीच चळवळ आता पुणे–नाशिक रेल्वेसाठी उभी राहायला हवी.

जनआंदोलनाच्या दिशा – काही संभाव्य मार्ग...

– सह्यांची मोहीम (Signature Campaign) – लाखो लोकांचा थेट दबाव.

– विद्यार्थी व तरुणांसाठी ‘Rail For Future’ मॅरेथॉन – पुढच्या पिढीचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी धाव.

– नाशिक-पुणे नागरिकांचा लाँग मार्च

– सोशल मीडिया मोहीम – # PuneNashikRailway, #RouteJustice, #SangamnerNeedsRailway

– संगमनेर–अकोले–नारायणगाव–मंचर–चाकण येथे जाहीर सभा, जनजागरण मोर्चे.

– तज्ञांची गोलमेज परिषद – GMRT मार्गाचा तांत्रिक अभ्यास, पर्यायी उपाय.

– स्थानिक उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी, महिला संघटना यांचा सहभाग

– निश्‍चितच, रेल्वेचा मार्ग सिन्नर–संगमनेर–नारायणगाव–चाकण मार्गेच असावा हा आग्रह केवळ भावनिक नाही; तो अभ्यासपूर्ण, तर्कशुद्ध आणि भविष्योन्मुख आहे.

नाशिक–पुणे रेल्वे हा या भागातील प्रवाशांची गैरसोय दूर करणारा आणि विकासाला चालना देणारा ठरणार आहे. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग मूळ नियोजित सिन्नर–संगमनेर–नारायणगाव–चाकणमार्गे गेलाच पाहिजे. हा प्रश्न पुढच्या पिढीच्या भविष्याचा आहे. राजकीय इच्छाशक्ती आणि जनतेचा निर्धार एकत्र आला, तर निर्णय बदलू शकतो. मात्र यासाठी मोठे, सातत्यपूर्ण, सशक्त जनआंदोलन उभे राहिले पाहिजे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे