वेस सोयेगाव साठवण तलाव हा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान – आ. आशुतोष काळे

वेस सोयेगाव साठवण तलाव हा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान – आ. आशुतोष काळे
वेस सोयेगाव साठवण तलाव हा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान – आ. आशुतोष काळे

कोपरगाव विजय कापसे दि १ जानेवारी २०२६-कोपरगाव तालुक्यातील वेस-सोयेगाव साठवण तलाव हा वेस सोयेगाव परिसरातील शेतीला बळ देणारा महत्त्वाकांक्षी जलसंधारण प्रकल्प असून हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांना वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले. वेस सोयेगाव येथे १0 कोटी रुपये निधीतून होणाऱ्या रूपांतरित साठवण तलावाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते गुरुवार (दि.०१) रोजी असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आ.आशुतोष काळे पुढे म्हणाले की, परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी राज्य शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून शासनाच्या जलसंधारण खात्याकडून सुमारे १० कोटी रुपये निधी मंजूर करून आणला. साठवण तलाव प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खोलीकरणाचे काम पूर्ण होवून साठवण तलावाची उंची साधारणपणे दोन मीटरने वाढणार असल्यामुळे साठवण क्षमता वाढणार आहे. यामुळे शेतीच्या व पिण्याच्या पाण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून याचा थेट लाभ शेतकरी वर्गाला मिळणार आहे. मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवून ठेवता येणार आहे. त्यामुळे भूजल पातळीत वाढ होवून त्याचा फायदा शेती सिंचनासाठी होणार असून उन्हाळ्यातील पाणीटंचाई कमी करण्यासाठी मदत होणार आहे. विशेषतः सोयेगाव व परिसरातील शेतकऱ्यांना या साठवण तलावाचा मोठा फायदा होणार आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन जलसंपदा मंत्री ना.जयंतरावजी पाटील तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, जलसंपदामंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून निळवंडे कालव्यांच्या कामाला गती दिल्यामुळे जलदगतीने चाऱ्यांची कामे सुरू असून, काकडी, मल्हारवाडी आणि डांगेवाडी येथे चारी क्रमांक ३ मधून पाणी मिळत आहे. तसेच चारी क्रमांक ४ आणि टेल लाईनचे काम चालू आहे, या तिन्ही चाऱ्यांमधून शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध होवून संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे.
निळवंडे धरणाचे पाणी येईपर्यंत कोणत्याही परिस्थितीत उजनी योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द जिरायती गावातील नागरीकांना दिला होता. तो शब्द पूर्ण करतांना आजही शहापूर, जवळके आणि धोंडेवाडी या गावांना उजनी योजनेच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे. हि योजना सुरु ठेवणे अवघड काम असतानाही मा. आ.अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात ही योजना यशस्वीपणे सुरु ठेवली व माझ्या काळातही अविरतपणे सुरु आहे. पूर चारीच्या माध्यमातून परिसरातील सर्व बंधारे एकमेकांशी जोडले जाणार आहे. यामुळे एका ठिकाणाहून पाणी सोडल्यास सर्व बंधारे भरतील आणि नागरिकांना पिण्याच्या तसेच शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होईल. या भागात पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे या भागातील शेतकरी ऊस रोपांची मागणी करू लागले असून शेतकरी ऊस लागवडीकडे वळले असल्याचे दिसत असून यावरून या भागात पाण्याची उपलब्धता वाढल्याचे सिद्ध होत आहे हि अतिशय समाधानाची बाब असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले. 
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्थापन झाल्यापासून आजवर सत्ता कायमच विरोधकांकडे होती. मात्र पहिल्यांदाच जिल्हा परिषद आपल्या कडे आली. त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून वैयक्तिक लाभाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचवता येवून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासकामांना गती देता आली. त्यामुळे सार्वजनिक विकासासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता आपल्या हातात असणे गरजेचे असून त्यासाठी एकजुटीने काम करून पुन्हा २०१६ ची पुनरावृत्ती करून जिल्हा परिषद, पंचायत समितीची सत्ता द्या असे आवाहन केले.
झगडे फाटा ते तळेगाव दिघे हा रोड अवजड वाहतूक जास्त असल्याने खराब झाला आहे. एवढ्या एकच रस्त्याचे काम बाकी आहे. आचारसंहितेमुळे या रस्त्याचे अंदाजपत्रक पूर्ण होवू शकले नाही. हा संपूर्ण रस्ता सहा ते सात फुट खोल उकरून सिमेंट काँक्रीटचा होणार आहे. राज्य शासनाच्या मदतीने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून निधी मंजूर करून रस्त्याचे काम मीच पूर्ण करणार असल्याचा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.
कोपरगाव तालुका परिसरात बिबट्याचा धोका कायम असल्याने शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, पोहेगाव आणि रांजणगाव सबस्टेशन हे शहा सबस्टेशनला जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना लवकरच दिवसा शेतीसाठी वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे.-आ.आशुतोष काळे.



