आपला जिल्हा

कोपरगावचे प्रसिद्ध जागृत पुरातन जुनीगंगा देवी मंदिर

कोपरगावचे प्रसिद्ध जागृत पुरातन जुनीगंगा देवी मंदिर
कोपरगावचे प्रसिद्ध जागृत पुरातन जुनीगंगा देवी मंदिर
कोपरगाव विजय कापसे दि २२ सप्टेंबर २०२५अहिल्यानगर-मनमाड महामार्गावर कोपरगाव शहरालगत जेऊर कुंभारी हद्दीत “जुनी गंगा देवी” मंदिर आहे.हे १९.८६४२०८ अक्षांश आणि ७४.४८२५८९ रेखांश येथे पुणतांबा चौफुली जवळ आहे. गोदावरी नदी ही शंभर वर्षांपूर्वी येथून वाहत होती. म्हणून या स्थानाला “जुनी गंगा” असे म्हटले जाते.

जाहिरात
गोदावरी तीरावरील कोपरगाव नगरी ही प्राचीन, पौराणिक आणि साधू-संतांच्या पद्स्पर्शाने पावन झालेली अध्यात्मिक भुमी आहे. कोपरगांव आणि जेऊर कुंभारी या गावांचा कारभार १७ व्या शतकापासून ते स्वातंत्र्यपुर्व काळापर्यंत श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थान यांचेकडे होता. 
पौराणिक कालखंडात देव-दानवांमध्ये कायम युध्द होत असे…अशाच एका युध्दाप्रसंगी देवी युध्दात समेट घडविण्यासाठी प्रकट झाली. त्या वेळेस गुरु शुक्राचार्य हे दानवांचे गुरू होते. त्यांना कळले कि, देवी आपल्याकडे येत आहे म्हणून ते देवीच्या स्वागतासाठी गावाबाहेर आले. देवी व गुरू शुक्राचार्य भेटीचे स्थान म्हणजे ‘जुनीगंगा देवी’ होय. देवीचे मुळ नाव “दुर्गामाता देवी” आहे. या भेटीची पौराणिक परंपरा म्हणून नवरात्र नंतर सिमोलंघन दिवशी (दसरा) गुरु शुक्राचार्य यांची पालखी जुनी गंगा देवीच्या भेटीस आजही येते. गुरु शुक्राचार्य देवस्थानचा सन १८४१-१८४७ साली कारभार पहाणारे सरदार रघुनाथराव विंचूरकर आणि सन १९५०-१९६४ साली कारभार पहाणारे सरदार गंगाधर उर्फ आबासाहेब मुजुमदार हे या पालखीत सहभागी झाले होते.

जाहिरात
जुनी गंगा देवीचे पौराणिक महत्व असलेल्या जागी दगडी चौथ-यावर तीन तांदळा (काळ्या रंगाची शिळा) होती.त्याला शेंदूर लावलेले असत. हे तांदळे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती रुपं मानली जात असे. या स्थानाचे पौराणिक महत्व जाणून येथे परंपरागत शेती व्यवसाय करणारा नाईकवाडे परिवाराने १७ व्या शतकापासून एका चौथ-यावर असलेल्या या तीनही देवींची पुजा, धार्मिक कार्य कुळाचार भावनेने करत आलेले आहेत. 
सन १९३५ साली सांज प्रहरी दोन व्यक्ती नशा करुन देवीच्या चौथ-यावर बसले. तेव्हा तेथील परिसरात साबरी झाडांचे घनदाट जंगल होते. नशेत धुंद एकाने तेथील एक तांदळ्याला लाथ मारली आणि रस्त्याने निघून जावू लागला. काही अंतरावर त्याला सर्पदंश झाला. लाथ मारणारा बेशुद्ध होताच जोडीदाराने बेशुद्ध व्यक्तीच्या घरी धाव घेतली आणि घडलेली हकिकत सांगितली. घटनाक्रम ऐकताच त्याच्या धर्म पत्नीने चौथ-याकडे धाव घेऊन देवीची माफी मागितली. माझ्या पतीने केलेल्या चुकीला क्षमा कर. मी तुझे मंदिर बाधेल.असा संकल्प सोडला. काही वेळाने तीचा पती शुध्दीवर आला. घडलेली घटना त्यांनी नाईकवाडे परिवाराला सांगितली.

जाहिरात
पती-पत्नीने मंदिर उभारणीच्या कामाला प्रारंभ केला. पायाचे खोदकाम सुरु झाले. साधारण अडीच फुट पायापर्यंत खोदतांना तेथे आलेल्या एक भक्ताचे अंगात देवी संचारली. मंदिर काम करणा-या कारागिराला देविने रुप दर्शवत “या पेक्षा अधिक खोल खोदू नका. खाली सात कढई धन आहे.” असा दृष्टांत दिला. यावर कारागिराने फक्त अडीच फुट पायावर मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला. मंदिर उभे राहिले. भाविकांनी त्या कार्यात सहभागी होवून हातभार लावला. दगड, विट आणि चुन्याचा वापर करुन मंदिर उभे राहिले. गाभाऱ्यात दोन्ही बाजूंना दोन-दोन देवळी तयार केली. यात एका देवळीत अखंड दीप लावला. जो आजही तेवत आहे. 
मंदिर उभारल्यानंतर तीन तांदळे असलेल्या ठिकाणी देवीची मूर्ती साकारण्याचे ठरले. मुर्ती तयार झाली परंतू येवला येथील कारागिराला देवीचा तेजस्वी चेहरा कलाकार म्हणून साकारतांना मनासारखा होत नव्हता. अशा प्रसंगी या कारागिराला जेवण घेऊन येणाऱ्या कलावतीबाई तात्याबा  नाईकवाडे यांच्या चेह-यातून देवीने दृष्टांत देत देवीच्या चेह-याचे रुप दर्शविले. कारागिराने नम्रपणे नमस्कार करत पुढील कारागिरीला सुरुवात केली. देवीची मूर्ती पुर्ण झाली. 
मंदिरातील गाभाऱ्यात सद्यस्थितीत देवीच्या दोन मुर्ती आहे. गाभाऱ्यात तीन तांदळे ( महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती ) यावर आच्छादन म्हणून देवीचा चेहरा असलेली अर्धा कृती मुर्ती साकारली. या मुर्तीची उंची ३६ इंच, लांबी ३३ इंच आणि रुंदी २२ इंच आहे. या मुर्तीच्या पाठीमागे भव्य दिसणारी वाघावर आरुढ झालेली देवीची मूर्ती आहे. मुर्तीची उंची ८० इंच असून लांबी ६४ इंच तर रुंदी १६ इंच आहे. देवीला अष्टभुजा असून उजव्या हातांमध्ये सप्तशती ग्रंथ, त्रिशूळ,तलवार आणि गदा आहे. तर डाव्या हातांमध्ये शंख, कमळ, राक्षसाचे शिर आणि दानपात्र आहे. देवीला नऊवार वस्र परिधान केली आहे. या दोन्ही मूर्ती ही चुना, सिमेंट चा वापर करुन येवला येथील मुर्तीकाराने घडवली आहे. देवी समोर गाडीवान(सारथी) छोटे मंदिर आहे.
देवस्थानचे अध्यक्ष  विलास नाईकवाडे परिवाराकडे देवस्थानची जबाबदारी पुर्वपरंपरागत आहे. देवी मंदिरासमोर १४ फुट उंचीची दिपमाळ आहे. जेऊर कु़ंभारीचे कै.रंगनाथ वक्ते यांनी दीपमाळ उभारणीत योगदान दिले आहे. मंदिर हे ११ गुंठे परिसरात विस्तारले आहे. मंदिरासमोर पूर्व दिशेला नाईकवाडे परिवाराचे जागेत नवरात्र उत्सवासाठी सभागृह बांधले असून या कार्याला विधानपरिषदेचे तत्कालीन सभापती प्रा. ना. स. फरांदे यांनी विशेष निधी देवून सहकार्य केले आहे. 
जुनी गंगा देवी मंदिर हे गोदावरी नदीचे जुन्या पात्रात आहे. जुना नगर – मनमाड महामार्ग मंदिराच्या समोरुन जातो. जेव्हा-जेव्हा गोदावरी दुथडी भरून वाहते आणि पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होते…तेव्हा-तेव्हा नदीपात्रातून पाणी फूटून जुनी गंगा दिशेला वळते. शेकडो वर्षांपासून देवीचे मंदिर अनेकदा पुराच्या पाण्यात येवूनही पूर ओसरल्यावर मुर्ती पुर्ववत राहते हे विशेष आहे. पुरा नंतर आजुबाजूची शेत जमीन,रस्ते पुराच्या धारेने खंगाळुन जातात. मात्र फक्त अडीच फुट खोल पाया असलेले जुनी गंगा मंदिर पुर्ववत राहते. यावरुन या स्थानाची शक्ती आणि महत्व अधोरेखित होते.
गोदावरी नदीचे पाणी पुराच्या काळात जुनी गंगा दिशेने फुटल्याने कोपरगाव शहरात पाणी पातळी कमी राहून जिवीत आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात टळते. देवी आपल्याला संकटात तारते ही मोठी भावना कोपरगावकरात आजही आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील बहुतांश नागरिक शहराबाहेर प्रवासाचे निमित्ताने शिर्डी दिशेने निघालेवर जुन्या नगर-मनमाड मार्गे जावून देवीला आवर्जून नमस्कार करत पुढे मार्गस्थ होतात.
आश्विन महिन्यात घटस्थापना पासून नवरात्र उत्सवाची सुरुवात येथे होते. विविध खाद्य-पेय पदार्थ,घरगुती वापराच्या पारंपरिक वस्तू, खेळणी दुकाने अशी छोट्या-छोट्या दुकानदारांची रेलचेल असते. हौशे-नवशे-गवशे यामुळे येथे यात्रेचे स्वरूप पहावयास मिळते. संकलन : सुशांत घोडके (गोदापरिसर अभ्यासक) 
     

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे