शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय करू नका; बोगस खत विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा – आ. आशुतोष काळे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय करू नका;
बोगस खत विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा – आ. आशुतोष काळे
शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय करू नका;
बोगस खत विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करा – आ. आशुतोष काळे

कोपरगाव विजय कापसे दि २७ फेब्रुवारी २०२६–
कोपरगाव तालुक्यात कृषी सेवा केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बोगस खतांची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शेतकऱ्यांच्या कष्टाशी खेळणाऱ्या कुणाचीही गय करू नका दोषी कृषी सेवा केंद्र आणि खत कंपन्यांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी तालुका कृषी अधिकारी यांना दिल्या आहे.

गेल्या महिनाभरापासून कोपरगाव तालुक्यात कृषी विभागाच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मोठी मोहीम राबवली आहे. या मोहिमेत तालुक्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून सुमारे १५ लाख रुपये किमतीचे ५१ मेट्रिक टन बोगस खत जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांसह खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आ. आशुतोष काळे यांनी कृषी विभागाच्या या कारवाईचे समर्थन करतानाच सूचना केल्या आहेत की केवळ काही ठिकाणी कारवाई करून थांबू नका. तालुक्यातील सर्व संशयास्पद खत साठ्यांची तपासणी करा आणि जिथे कुठे बनावट खत आढळेल तिथे कडक कायदेशीर कारवाई करा. यावेळी आ. आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांना हि आवाहन केले आहे कि, खते खरेदी करताना पक्के बिल आणि तडताळणी करूनच खते खरेदी करा. कुठेही बोगस खत आढळल्यास त्वरित कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करा जेणे करून भविष्यात कोणत्याही कंपनीचे शेतकऱ्यांना फसवण्याचे धाडस होणार नाही.

शेतकरी निसर्गाचा लहरीपणा आणि शेतमालाचा अनिश्चित दरामुळे आधीच आर्थिक संकटात सापडला असून मोठ्या प्रमाणात कर्जाच्या विळख्यात अडकला आहे. यातून बाहेर पाडण्यासाठी शेतकरी प्रामाणिक धडपड करत असताना शेतातील पिकाचे उत्पन्न वाढावे म्हणून रासायनिक खताचा वापर करीत असतो. मात्र बोगस खत शेतकऱ्यांच्या पदरी पडत असल्याने शेतकऱ्यांना नफ्याच्या ऐवजी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी कृषी विभागाने अधिक सतर्क राहून तालुक्यात सातत्याने तपासणी पथके तैनात ठवून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहे.



