गाडगेबाबा प्रतिष्ठान तर्फे सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ५० ग्रंथांची भेट

गाडगेबाबा प्रतिष्ठान तर्फे सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ५० ग्रंथांची भेट
गाडगेबाबा प्रतिष्ठान तर्फे सोमैया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ५० ग्रंथांची भेट

कोपरगाव विजय कापसे दि ३ मार्च २०२६– आजच्या मोबाईल व माहिती तंत्रज्ञानाच्या युगात लुप्त होत चाललेली वाचन संस्कृती पुन्हा रुजवण्यासाठी तसेच वाढविण्यासाठी आपणा सर्वांचे सकारात्मक प्रयत्न गरजेचे आहेत. कोपरगाव सारख्या ग्रामीण भागातील सोमैया महाविद्यालय एक नामांकित महाविद्यालय असून येथील विद्यार्थी वक्तृत्व, वादविवाद, काव्य-लेखन, निबंध-लेखन तसेच अभिनय व क्रीडा या कलाप्रकारात राष्ट्रीय व राज्यस्तरावर नेत्रदीपक यश प्राप्त करीत आहेत, ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे”, असे गौरवोद्गार संगमनेर येथील श्री संत गाडगेबाबा भानू प्रभाकर सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. चंद्रभान देशमुख यांनी काढले.

के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या हिंदी विभाग, वाङ्मय मंडळ व संत गाडगेबाबा भानू प्रभाकार सेवा प्रतिष्ठान संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ग्रंथ वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा. संदीप रोहमारे, प्रा. संदीप सातपुते (ज्ञानमाता कनिष्ठ महाविद्यालय संगमनेर), मा. सुधीर डागा व प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चालू शैक्षणिक वर्षात सोमैया महाविद्यालयाच्या स्थानिक तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील वक्तृत्व, वादविवाद, निबंध, काव्य-लेखन, अभिनय व क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवणाऱ्या ५० विद्यार्थ्यांना संगमनेर येथील संत गाडगेबाबा भानू प्रभाकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. चंद्रभान देशमुख यांनी १३५०० किमतीचे ५० ग्रंथ भेट दिले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रा. देशमुख बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. संदीप रोहमारे यांनी ग्रंथदाते प्रा. चंद्रभान देशमुख यांचे आभार मानत तसेच महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत वाचन चळवळीचे महत्त्व उदाहरणासह स्पष्ट केले. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. विजय ठाणगे म्हणाले की, “महाविद्यालयातील विविध कला प्रकारातील नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी वाचनाकडे देखील लक्ष केंद्रित करावे. वाचनामुळे आपला वैचारिक विकास होण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी जपावी.”

या प्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य सुधीर डागा म्हणाले की “कोणत्याही शाळा-महाविद्यालयातील उंच इमारती किंवा त्यांच्या भिंतीतून विकास होत नसतो तर तो तेथील विद्यार्थी व शिक्षकांच्या कर्तृत्वाने सिद्ध होत असतो. आज ज्यांना ‘एक होता कार्व्हर’ ग्रंथ भेट मिळाला ते वाचून उद्याचे कर्तृत्वान व सुसंस्कारित नागरिक नक्कीच घडतील, यात शंका नाही.” या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन, प्रास्ताविक व अतिथी परिचय वाङ्मय मंडळ व हिंदी विभाग प्रमुख डॉ. जिभाऊ मोरे यांनी केले. या कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी तसेच प्राध्यापक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय दवंगे व आभार प्रदर्शन प्रा. किरण सोळसे यांनी केले.



