४४२५ मुली व महिलांच्या सहभागात एकविरा महिला क्रिकेटचा थरार सुरू

एकविराचे महिला व युवतींना क्रीडा स्पर्धांसाठी मोठे व्यासपीठ –माजी मंत्री बाळासाहेब थोरात
जागतिक महिला दिनानिमित्त क्रिकेट रस्सीखेच व बॅडमिंटन स्पर्धेचा शानदार शुभारंभ

संगमनेर विजय कापसे दि ७ मार्च २०२६— कुटुंबाच्या राज्याच्या आणि देशाच्या विकासात महिलांचे मोठे योगदान आहे. आज विविध क्षेत्रात महिलांनी मिळवलेले नेत्रदीपक यश हे कौतुकास्पद असून नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे. एकविराच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धांमधून सर्वांनी आनंद घ्या .कारण ही ऊर्जा आपल्या कामासाठी वर्षभर टिकणारी असते. एकविराच्या या स्पर्धांमुळे तालुक्यातील युवती व महिलांसाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले असून एकविराच्या विविध स्पर्धांमधून 4525 मुली व महिलांच्या सहभागात शानदार शुभारंभ झाला

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे एकविरा फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला दिनानिमित्त क्रीडा महोत्सव 2026 च्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा आ डॉ सुधीर तांबे हे होते तर व्यासपीठावर सौ दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ मैथिलीताई तांबे, एकविराच्या अध्यक्षा डॉ जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे ,अजय फटांगरे,सौ प्रमिलाताई अभंग, सौ अर्चनाताई बालोडे ,सौ निर्मलाताई गुंजाळ, एकविराच्या शीला पंजाबी, डॉ वृषाली साबळे, शर्मिला हांडे, प्राजक्ता घुले, आदिती खोजे ,तपस्या देशमुख, सुरभी मोरे, वैष्णवी खेडलेकर, तृष्णा आवटी, डॉ सुरभी असोपा, सुनिता कांदळकर, सुविधा आरसिद्ध, यांच्यासह नगरसेविका व विविध महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, राजमाता जिजाऊ ,पुण्यश्लोक आहिल्यादेवी ,सावित्रीबाई फुले, इंदिरा गांधी, मदर तेरेसा, झाशीची राणी यांचा वारसा चालवणाऱ्या भारतीय महिलांनी विविध क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. ही सर्व कामगिरी देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे .संगमनेर तालुक्यातील ही अनेक मुलींनी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठे यश मिळवले आहे. अभ्यास करा, वडीलधाऱ्यांचा सन्मान करा .याचबरोबर एकविराच्या माध्यमातून होणाऱ्या स्पर्धांमधून खेळा आनंद घ्या. कारण की आनंद देणारी ऊर्जा वर्षभराच्या कामासाठी महत्त्वाची ठरणारी आहे.

तर मा आ डॉ सुधीर तांबे म्हणाले की चांगले आहाराबरोबर चांगला व्यायाम अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या स्पर्धा मुलींसाठी मोठे व्यासपीठ निर्माण करून देणारे आहे.

तर डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, पोलीस, क्रिकेट, चार्टर्ड अकाउंटंट, विविध खेळ यांचा विविध स्पर्धा परीक्षांमधून संगमनेर तालुक्यातील मुलींनी आपल्या तालुक्याचा लौकिक वाढवला आहे. या सर्वांची कामगिरी आपल्यासाठी अभिमानास्पद असून संगमनेर मधून अनेक गुणवंत खेळाडू आहेत. त्यांना संधी देण्याचे काम एकविराच्या माध्यमातून होत असून मुलींच्या करियरसह शिक्षण, आरोग्य आणि महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धांमध्ये महिलांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत असून यावेळेस पाच दिवस या स्पर्धा चालणार असून सर्वांनी आनंद घ्या, स्वस्थ रहा, मस्त रहा जबरदस्त रहा असा सल्ला त्यांनी दिला.
याप्रसंगी विविध महिला संघाच्या खेळाडू, नगरसेविका, विविध महिला पदाधिकारी प्रा बाबा खरात, डॉ नितीन भांड ,रामदास तांबडे, के.डी देशमुख, सुनील सांगळे, पराग थोरात, दिलीप बांबळे, मिलिंद आवटी, सत्यजित थोरात, एस एम खेमनर यांच्यासह विविध मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
क्रिकेटमध्ये 161 तर रस्सीखेच मध्ये 160 संघांचा सहभाग
एकविराच्या वतीने होत असलेल्या क्रीडा महोत्सवात दरवर्षी महिलांचा सहभाग वाढत असून यावर्षी क्रिकेटमध्ये 161 संघ असून त्यामध्ये 2415 महिला सहभागी होणार आहेत. तर रस्सीखेच मध्ये 160 संघांचा सहभाग असून त्यामध्ये 1760 महिला सहभागी होणार आहेत याचबरोबर बॅडमिंटनमध्ये 250. महिलांचा सहभाग असणार आहे अशा एकूण 4424 मुली व महिलांचा सहभाग असणार आहे यामध्ये 68 वर्षीय आजी सुद्धा सहभागी होणार आहेत. प्रेक्षक गॅलरी हिरवे मैदान थेट लाईव्ह प्रक्षेपण सर्व खेळाडूंना कॅप व सणकोट षटकारा चौकारांच्या आतिषबाजी यामुळे या स्पर्धा अत्यंत रोमांचकारी ठरणार असून या स्पर्धांचा जास्तीत जास्त नागरिक व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलींचा सत्कार
आयपीएल खेळाडू माया सोनवणे, चार्टर्ड अकाउंटंट झालेली निशिगंधा कानवडे, राज्यस्तरीय वैज्ञानिक स्कॉलरशिप साठी पात्र ठरलेली वैष्णवी कवडे, पोलीस प्रतीक्षा चाचण ,सोशल मीडिया इन्क्लूसर दिपाली वाकळे, बीएसएफ मधील निवड झालेली अश्विनी रोडे ,विद्युत सहाय्यक वैष्णवी जोरवेकर तसेच राष्ट्रीय नेट बॉल मध्ये यश मिळवणाऱ्या दिगंबर सराफ व जाजू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी यांसह तालुक्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व यश मिळवणाऱ्या 22 महिलांचा सन्मानचिन्ह शाल बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.












