राजहंसच्या मिशन 50 L अंतर्गत तालुक्यातील 50 युवा शेतकऱ्यांचा पंजाब अभ्यास दौरा

राजहंसच्या मिशन 50 L अंतर्गत तालुक्यातील 50 युवा शेतकऱ्यांचा पंजाब अभ्यास दौरा


या सात दिवसांच्या अभ्यास दौऱ्यात चेअरमन रणजीतसिंह देशमुख, व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर, संचालक विलास कवडे, डॉ.प्रमोद पावसे,संतोष मांडेकर,तालुक्यातील 35 युवा उद्योजक दूध उत्पादक शेतकरी व 15 पशुवैद्यकीय अधिकारी याचबरोबर दूध संघाच्या वतीने पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.विजय कवडे,ॲड सुरेश जोंधळे यांचा समावेश आहे.

हे शिष्टमंडळ दिल्ली येथून पंजाब मधील फिरोजपुर येथे दाखल होणार आहे तेथील मोठे गाय गोठे असलेल्या शेतकऱ्यांच्या फार्मला भेट देणार आहेत. याचबरोबर वैद्यकीय अधिकारी व्हेटर्नरी सेमिनार साठी उपस्थित राहणार असून फार्म मॅनेजमेंट साठी तीन दिवसांचे ट्रेनिंग ठेवण्यात आले आहे.

देशात सर्वाधिक दूध उत्पादन हे पंजाबमध्ये होत असून तेथील शेतकऱ्यांनी कमी गाईंमध्ये जास्त दूध उत्पादन घेतले आहे. या संकल्पनेतून संघाच्या वतीने मिशन 50 लिटर राबविण्यात येत आहे. 50 लिटर गाय निर्माण करण्यासाठी संघाच्या वतीने विशेष प्रणाली राबवण्यात आली असून पुढील सात वर्षांमध्ये विविध गोठ्यांमध्ये या गाई असतील असा विश्वास रणजीतसिंह देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
यावेळी शुभेच्छा देताना माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, शुद्धता आणि गुणवत्ता जपल्यामुळे राजहंस दूध संघाचे नाव राज्यात मोठे आहे. दूध हे शाश्वत उत्पादन देणारे आहे. गोरगरिबांच्या जीवनामध्ये या व्यवसायामुळे समृद्धी आली आहे. राजहंसचा मुरघास व मुक्त संचार गोठा प्रकल्प राज्यासाठी अनुकरणीय ठरला आहे. आगामी काळात कमी गाईंमध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी दूध संघाच्या वतीने मिशन 50 लिटर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यामधून 50 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गाई निर्माण होतील. या अभ्यास दौऱ्यामुळे पंजाब मध्ये या व्यवसायामध्ये झालेली क्रांती शेतकऱ्यांना पहावयास मिळणार आहे. तेथील नवीन पद्धतींचा अवलंब हे शेतकरी संगमनेर तालुक्यात करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी संघाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील युवा उद्योजक शेतकऱ्यांचा हा अभ्यास दौरा संगमनेर तालुक्यातील दूध उत्पादन वाढीसाठी नक्कीच फायदेशीर होणार असल्याचे कार्यकारी संचालक डॉ.सुजित खिलारी यांनी म्हटले आहे.




