वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे

वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे काळाची गरज – पालकमंत्री डॉ राधाकृष्ण विखे
राज्यातील तिसरे डिजिटल ग्रंथालय उपकेंद्र लोणी-हसनापूर परिसरासाठी मानबिंदू ठरणार
आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व जिल्हा ग्रंथालयाच्या डिजिटल उपकेंद्राच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा
Shirdi vijay kapse दि १९ जून २०२६ :–भविष्यातील वाढते जलदुर्भिक्ष लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने, विशेषतः वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी, पाण्याचा नियोजनबद्ध व काटकसरीने वापर करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.
लोणी (हसनापूर) येथे नवनिर्मित आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह व जिल्हा ग्रंथालयाच्या डिजिटल उपकेंद्राच्या इमारतीच्या लोकार्पणप्रसंगी श्री. विखे पाटील बोलत होते. याप्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, आदिवासी विकास विभागाचे सहआयुक्त स्वप्निल साबळे, राजूर प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, कार्यकारी अभियंता बाळासाहेब ननवरे, उपअभियंता मयूर मुनोत, उपअभियंता सचिन वंजारी, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मगरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, राज्यातील तिसरे डिजिटल ग्रंथालय उपकेंद्र लोणी-हसनापूर परिसरासाठी मानबिंदू ठरणार असून, स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते अत्यंत उपयुक्त ठरेल. या आधुनिक इमारतीसाठी जिल्हा नियोजन मंडळातून पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, येथे दूरदृश्य प्रणालीसह विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

सध्या पावसाअभावी धरणे रिकामी होत चालली असून, पिण्याच्या पाण्याचे नियोजन ऑगस्टवरून आता सप्टेंबरपर्यंत वाढवावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर पाण्याचा पुनर्वापर वाढविण्यासाठी या इमारतीत जलपुनर्वापर व सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारावी. वसतिगृहांमध्ये पाण्याचा अपव्यय तसेच नळ किंवा काचा फोडण्याच्या प्रवृत्तींना आळा बसला पाहिजे. ही मालमत्ता शासनाची असली तरी ती जनतेच्या पैशातून उभारलेली असल्याने जनतेचीच संपत्ती आहे. या सर्व परिस्थितीसाठी केवळ विद्यार्थ्यांना दोष न देता प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही संवेदनशील राहून मुलांच्या दैनंदिन अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

विद्यार्थ्यांच्या समस्या वेळेवर सोडवल्यास त्यांच्यावर संप करण्याची किंवा ‘लाँग मार्च’ काढण्याची वेळ येणार नाही. प्रशासन संवेदनशील राहिल्यास विद्यार्थीही प्रशासनाला सहकार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाने संयुक्तपणे ५०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे सभागृह उभारावे, जे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सुचवले. तसेच मुला-मुलींचे मानसिक आरोग्य व शारीरिक तंदुरुस्ती उत्तम राहण्यासाठी सुसज्ज व्यायामशाळा उभारण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. आदिवासी समाजातील मुली शिक्षणात व गुणवत्तेत आघाडीवर असल्याबद्दल त्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.

ग्रंथालय संचालक श्री. गाडेकर म्हणाले की, राज्यातील तिसरे जिल्हा ग्रंथालय उपकेंद्र पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने राहाता तालुक्यात सुरू होत असून, याद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके, संगणक, डिजिटल व छापील साहित्य उपलब्ध होणार आहे. विद्यार्थ्यांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
महानगरपालिकेच्या माध्यमातून अहिल्यानगर येथे उभारण्यात येत असलेल्या जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या स्वतंत्र इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून, ही भव्य वास्तू जिल्ह्याच्या वैभवात भर घालेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अहिल्यानगर जिल्ह्यात शतकोत्तर परंपरा असलेली सुमारे ४८० ग्रंथालये असून येथील वाचन चळवळ अतिशय गतिमान असल्याचे श्री. गाडेकर म्हणाले.
राज्य शासनाच्या सकारात्मक निर्णयामुळे १६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या राज्य ग्रंथालय परिषदेची स्थापना झाली असून, त्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागण्यास मदत होईल, असेही श्री. गाडेकर यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्रीमती बोकडे म्हणाल्या की, आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहाची प्रवेश क्षमता ७५ वरून १५० विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. या नूतन इमारतीत प्रत्येक मजल्यावर अभ्यासिका तसेच निवासासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनीही मनोगत व्यक्त केले.





