काँग्रेसच्या आंदोलनाला यश; संगमनेर तालुक्यासाठी बफर स्टॉकमधून ३५० मे.टन युरिया मंजूर
काँग्रेसच्या आंदोलनाला यश; संगमनेर तालुक्यासाठी बफर स्टॉकमधून ३५० मे.टन युरिया मंजूर
काँग्रेसच्या आंदोलनाला यश; संगमनेर तालुक्यासाठी बफर स्टॉकमधून ३५० मे.टन युरिया मंजूर
Sangmner vijay kapse दि १९ जुलै २०२६: राज्याचे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीने युरिया टंचाईविरोधात केलेल्या आंदोलनाची शासनाने दखल घेत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या बफर स्टॉकमधून 349.52 मे.टन (सुमारे 350 मे.टन) युरिया उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे खरीप हंगामात युरियाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्या खरीप हंगाम सुरू असून तालुक्यात मका, सोयाबीन, बाजरीसह विविध पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. काही भागांत पेरणी अद्याप सुरू असून पिकांच्या वाढीसाठी युरिया खताची तातडीची गरज निर्माण झाली होती. मात्र युरियाचा पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती.
या पार्श्वभूमीवर 14 जुलै 2026 रोजी संगमनेर तालुका काँग्रेस कमिटी व विविध गावांतील शेतकऱ्यांनी उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे शासनाच्या ताब्यातील बफर स्टॉकमधून युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी करत आंदोलन केले होते. त्यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी मागणीचा सकारात्मक विचार करून आवश्यक युरिया उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.

त्या अनुषंगाने खरीप हंगाम 2026-27 साठी उपलब्ध संरक्षित साठ्यातून 349.52 मे.टन युरिया कृषी विक्रेत्यांकडे वितरित करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे पिकांसाठी ही युरिया योग्य वेळी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गुंजाळवाडीचे सरपंच व प्रगतशील शेतकरी नरेंद्र गुंजाळ यांनी सर्व पात्र शेतकऱ्यांना आवश्यक त्या प्रमाणात युरिया तातडीने व सहज उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

थोरात यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना सुविधा सहज उपलब्ध होत होत्या
माजी महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना युरियासह विविध कृषी सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ सहज मिळत होता. मात्र मागील दोन वर्षांपासून संगमनेर तालुक्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. काँग्रेसच्या आंदोलनामुळे बफर स्टॉकमधून युरिया उपलब्ध झाल्याने काहीसा दिलासा मिळाला असला, तरी आगामी काळात तालुक्याच्या गरजेनुसार पुरेशा प्रमाणात युरियाचा पुरवठा करावा, अशी मागणी वाघापूर येथील शेतकरी नामदेव शिंदे यांनी केली.



