संतवाणीचा निनाद, संस्कारांचा जागर; समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य कीर्तन स्पर्धा उत्साहात

संतवाणीचा निनाद, संस्कारांचा जागर; समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य कीर्तन स्पर्धा उत्साहात
संतवाणीचा निनाद, संस्कारांचा जागर; समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये भव्य कीर्तन स्पर्धा उत्साहात

Kopargaon vijay kapse दि २५ जुलै २०२६– आषाढी एकादशीचे औचित्य साधत समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये संतपरंपरेचा वारसा, भारतीय संस्कृतीची मूल्ये आणि भक्तीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने भव्य कीर्तन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी अभंग, भारूड, संतवाङ्मय आणि समाजप्रबोधनपर विषयांवर आधारित प्रभावी कीर्तन सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

कॉसमॉस, ओॲसिस, प्लॅटिनम आणि झेनिथ या चारही हाऊसच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण निरूपण, ओजस्वी वाणी आणि भावपूर्ण सादरीकरणातून संतविचारांचा जागर घडविला. कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. मोनिकाताई येवले आणि ह.भ.प. मयूर महाराज येवले हे प्रमुख पाहुणे व परीक्षक म्हणून उपस्थित होते. यावेळी सुहासिनीताई कोयटे (काकीजी), कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे, प्राचार्य समीर अत्तार आणि उपप्राचार्या मोहिनी जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना ह.भ.प. मोनिकाताई येवले यांनी कीर्तन ही केवळ कला नसून संस्कार, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाची प्रभावी परंपरा असल्याचे सांगितले. संतांचे विचार आचरणात आणून सत्य, सेवा, सदाचार आणि भक्तीचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

स्पर्धेचा निकाल जाहीर झाल्यानंतर ह.भ.प. मयूर महाराज येवले यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाचे कौतुक केले. संतसाहित्य आणि भारतीय संस्कृतीचा वारसा जपण्याची जबाबदारी आजच्या पिढीवर असून, भविष्यात संतविचारांचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचविणारा इंग्रजी भाषिक कीर्तनकार समता इंटरनॅशनल स्कूलमधून घडावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांनी शिक्षणाबरोबर संस्कार, संस्कृती आणि अध्यात्माची जोड विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, वक्तृत्वकौशल्य आणि सामाजिक जाणीव विकसित होते, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धेच्या यशामागे जयश्री श्रीवास्तव, शिल्पा इंगळे, सुजाता वाणी आणि नंदिनी वक्ते या हाऊस मास्टर्सचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. चुरशीच्या स्पर्धेत झेनिथ हाऊसने प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर विजेतेपद पटकावले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या संघाला चॅम्पियन ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमस्थळाची आकर्षक सजावट कला शिक्षक विभावरी नगरकर, मंगेश गायकवाड आणि गोरख बोरसे यांनी साकारली. संपूर्ण नियोजन व समन्वय किरण लद्दे आणि आकाश मिश्रा यांनी केला. सूत्रसंचालन निधी जगताप, गौरव काकडे आणि नंदिनी वक्ते यांनी केले, तर शिल्पा इंगळे यांनी आभार प्रदर्शन केले.

मूल्याधिष्ठित शिक्षण, संतविचारांची जोपासना आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन करणारी ही भव्य कीर्तन स्पर्धा समता इंटरनॅशनल स्कूलच्या शैक्षणिक वाटचालीतील आणखी एक प्रेरणादायी आणि संस्मरणीय अध्याय ठरली.



