सातत्य आणि सकारात्मक ध्यासातूनच यश मिळते : कल्पेश चव्हाण

सातत्य आणि सकारात्मक ध्यासातूनच यश मिळते : कल्पेश चव्हाण
नाद संगीत विद्यालयाचा दहावा वर्धापन दिन उत्साहात साजरा
Kopargaon vijay kapse दि ३० जुलै २०२६: जीवनात अनेक चढउतार येत असले तरी ध्येय निश्चित असेल आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न केले तर यश निश्चित मिळते. कोणतेही कार्य सातत्याने केल्यास त्याचे यशस्वी फळ मिळते. हभप शंकर महाराज गोंडे यांनी दहा वर्षांपूर्वी केवळ एका विद्यार्थ्यापासून सुरू केलेल्या नाद संगीत विद्यालयाने आज शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना संगीताचे संस्कार दिले आहेत. सकारात्मक ध्यासातून मोठे कार्य उभे राहू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे शंकर महाराज गोंडे आहेत, असे प्रतिपादन शिर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश चव्हाण यांनी केले.

कोपरगाव व राहाता तालुक्यात कार्यरत असलेल्या नाद संगीत विद्यालयाचा दहावा वर्धापन दिन विद्यालयाचे संचालक हभप शंकर महाराज गोंडे यांच्या संकल्पनेतून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “अवतान लोकसंगीताचे” या दोन दिवसीय कार्यक्रमांतर्गत २४ जुलै रोजी कोपरगाव तालुक्यातील वारी येथील जगदंबा देवी सभागृहात आणि २६ जुलै रोजी राहाता येथील एकनाथ मंगल कार्यालयात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक आकांक्षा जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दशरथ गव्हाणे, मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा सचिव पत्रकार रोहित टेके, डॉ. दत्तात्रय कानडे, शेतकरी सेनेचे गोरख टेके, कोपरगाव पंचायत समितीचे माजी सदस्य अशोकराव कानडे, हभप योगेश महाराज करंजीकर, हभप बाबासाहेब महाराज शिंदे, नानासाहेब नेवगे, शांताराम जाधव, कैलास गोंडे, विलास गोंडे, नितीन वाघ, प्रगती वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पत्रकार रोहित टेके यांनी हभप शंकर महाराज गोंडे यांच्या संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

कार्यक्रमात नाद संगीत विद्यालयातील बारा वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांपासून बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध लोकगीते सुमधुर स्वरांत सादर केली. तसेच पारंपरिक वाद्यांचे उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थित रसिकांची मने जिंकली. कलाकारांच्या मनमोहक सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली, तसेच चिमुकल्या कलाकारांवर पारितोषिकांचा वर्षाव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार विद्यालयाचे संचालक हभप शंकर महाराज गोंडे यांनी मानले. सूत्रसंचालन चंद्रविलास गव्हाणे व मीना शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालक, विद्यार्थी व सर्व सहकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या कलाकारांनी केले सादरीकरण
किर्ती निमसे, वैष्णवी निमसे, सौम्या भोसले, राजलक्ष्मी कासार, राघव पाटील, किरण गोर्डे, श्रीप्रेम गोसावी, श्लोक गोसावी, भुषण वैष्णव, अल्पेश ललवाणी, अनिकेत नन्नवरे, श्रावणी संत, ईश्वरी कानडे, भव्य नाकराणी, साईश शिंदे, स्वानंदी थोरात यांच्यासह नाद संगीत विद्यालयातील सर्व विद्यार्थीवृंद यांनी उत्कृष्ट सादरीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.



