पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला महत्त्वाचा टप्पा

पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला महत्त्वाचा टप्पा
पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समितीची स्थापना; आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला महत्त्वाचा टप्पा

Sangmner vijay kapse दि ६ ऑगस्ट २०२६ : पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या संदर्भात राज्य शासनाने तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून, या निर्णयाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी स्वागत केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रेल्वे मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार तांबे यांनी हा निर्णय प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.

२५ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुणे–नाशिक सरळ रेल्वेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री यांनी तज्ज्ञ समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनानुसार आता समितीची स्थापना करण्यात आली असून, पुढील ६० दिवसांत समिती राज्य शासनाला आपला अहवाल सादर करणार आहे.
याबाबत समाधान व्यक्त करताना आमदार यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विषयाकडे सुरुवातीपासून सकारात्मक दृष्टीने पाहिले आहे. राज्य शासनाची भूमिका सकारात्मक असून, तज्ज्ञ समितीच्या अभ्यासातून प्रकल्पाला पुढील दिशा मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पुणे–नाशिक सरळ रेल्वेची मागणी ही केवळ एका रेल्वे मार्गापुरती मर्यादित नसून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाशी निगडित असल्याचे तांबे यांनी नमूद केले. सिन्नर, अकोले, संगमनेर, नारायणगाव, आंबेगाव, राजगुरुनगर आणि चाकण मार्गे पुण्याशी जोडणारा हा रेल्वेमार्ग उद्योग, शिक्षण, रोजगार, शेती आणि व्यापारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी क्रांती दिनानिमित्त सकाळी ९ वाजता पुणे–नाशिक महामार्गावर प्रस्तावित चक्काजाम जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. हे आंदोलन कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाच्या विरोधात नसून पुणे–नाशिक सरळ रेल्वेच्या समर्थनार्थ असल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाच्या सकारात्मक भूमिकेला बळ मिळावे आणि केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयापर्यंत उत्तर महाराष्ट्रातील जनभावना प्रभावीपणे पोहोचाव्यात, हा आंदोलनामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘ज्यांनी रेल्वे पळवली, तेच आता श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत’ – रेल्वे संघर्ष समिती
रेल्वे संघर्ष समितीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेचा मूळ मार्ग नियोजित असताना महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यात बदल करण्यात आला. तसेच संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनीही या बदलाला पाठिंबा दिल्याचा आरोप समितीने केला आहे. आता तेच पत्रकबाजी करून श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा समितीने केला आहे.
समितीच्या मते, हे आंदोलन संगमनेर तालुक्यासह उत्तर महाराष्ट्राच्या विकासासाठी असून, ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनात सर्वपक्षीय युवक, युवती आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. “अभी नहीं तो कभी नहीं” या घोषवाक्यासह रेल्वेसाठीचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धारही समितीने व्यक्त केला आहे.



