शिवसेना अहिल्यानगर जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी ज्ञानेश कपिले
शिवसेना अहिल्यानगर जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी ज्ञानेश कपिले
कोपरगावातील एकनिष्ठ शिवसैनिकाची निवड; पक्षाची भूमिका व शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी
Kopargaon vijay kapse दि ८ ऑगस्ट २०२६ : शिवसेना पक्षाची भूमिका, पक्षाचे विविध कार्यक्रम तसेच शासनाच्या लोककल्याणकारी योजना सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये कोपरगाव येथील एकनिष्ठ शिवसैनिक ज्ञानेश वसंतराव कपिले यांची शिवसेना अहिल्यानगर जिल्हा सोशल मीडिया प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेनुसार सोशल मीडिया विभागाच्या माध्यमातून पक्षाचे विचार आणि शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.

सोशल मीडिया राज्यप्रमुख राहुल कनाल यांच्या आदेशानुसार शनिवार, दि. ८ ऑगस्ट रोजी मुंबई येथील बाळासाहेब भवनात उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. उत्तर महाराष्ट्र प्रतिनिधी प्रमुख मयूर मगर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सोशल मीडिया राज्य उपप्रमुख प्रतिक शर्मा आणि शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन ज्ञानेश कपिले यांची जिल्हा सोशल मीडिया प्रमुखपदी निवड करण्यात आली.

ज्ञानेश कपिले हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना पक्षात सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी विद्यार्थी सेनेचे उपशहर प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे कोपरगाव तालुकाप्रमुख,युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख आदी शिवसेना पक्षाच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. या काळात त्यांनी अनेक गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले असून, युवकांचे संघटन उभारण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
कपिले यांच्या पक्षनिष्ठा, सामाजिक कार्य आणि युवकांमध्ये असलेला जनसंपर्क याची दखल घेत त्यांच्यावर सोशल मीडिया विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पक्षाची ध्येयधोरणे, उपक्रम, शासनाच्या विविध योजना तसेच जनहिताचे निर्णय सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कार्य करणार असल्याचे कपिले यांनी सांगितले.
त्यांच्या नियुक्तीबद्दल शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख नितीन औताडे, कोपरगाव शहरप्रमुख अक्षय जाधव यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.





