अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत पत्रकारांच्या मताला ‘किंगमेकर’चे महत्त्व; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना विविध मतदारसंघांत प्रतिनिधित्व!

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत पत्रकारांच्या मताला ‘किंगमेकर’चे महत्त्व; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना विविध मतदारसंघांत प्रतिनिधित्व
अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत पत्रकारांच्या मताला ‘किंगमेकर’चे महत्त्व; महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना विविध मतदारसंघांत प्रतिनिधित्व!
Akole vijay kapse दि ८ ऑगस्ट २०२६:
आशिया खंडातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला यंदा विशेष राजकीय रंग चढला असून या निवडणुकीत प्रथमच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक पत्रकारांना विविध संस्थांचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून संधी मिळाल्याने त्यांच्या मताला मोठे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रत्येक मत निर्णायक ठरणार असल्याने पत्रकारांची भूमिका यंदा विशेष चर्चेचा विषय बनली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून संस्थांचे प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी १७ जून रोजी ठराव करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रक्रियेत अकोले तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाशी संबंधित पदाधिकाऱ्यांवर विश्वास व्यक्त करत त्यांना संस्थांचे प्रतिनिधी म्हणून निवडले आहे. त्यामुळे पत्रकार संघाचे प्रतिनिधी प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेत सहभागी होणार असून त्यांच्या भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सोसायटी मतदारसंघातून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले यांची डोंगरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. तसेच तालुका कार्याध्यक्ष दत्ता जाधव यांची सावरगाव पाट विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

शेतीपूरक गटातून पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांचा जय किसान सहकारी दूध संस्थाचे अध्यक्ष म्हणून प्रतिनिधी ठराव झाला आहे. बिगर शेती मतदारसंघातून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या सौभाग्यवती परिघा आरोटे यांची मुक्ताबाई मजूर सहकारी संस्था मर्यादित, पांगरी या संस्थेच्या प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. तसेच तालुका कार्याध्यक्ष दत्ता जाधव यांचा आदिवासी उन्नती सेवा मंडळातील सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित, राजूर या संस्थेचा प्रतिनिधी म्हणून ठराव झाला आहे.
याशिवाय पत्रकार अमोल वैद्य यांचे बंधू सचिन वैद्य यांची सुगाव खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतून सोसायटी मतदारसंघासाठी निवड झाली आहे. पत्रकार सुनील गीते यांचा श्रीराम मजूर सहकारी संस्था, कोतूळ या संस्थेतून बिगर शेती मतदारसंघासाठी ठराव झाला असून त्यांच्या सौभाग्यवती सौ. जयश्री सुनील गीते यांची सह्याद्री स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, कोतूळ येथून प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणाचा केंद्रबिंदू मानली जाते. या बँकेच्या संचालक मंडळावर निवडून जाण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेते, विद्यमान व माजी आमदार, खासदार तसेच प्रभावी सहकारी नेते प्रयत्नशील असतात. विशेषतः सोसायटी मतदारसंघ हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जात असल्याने या मतदारसंघातील प्रत्येक मताला मोठे महत्त्व असते.
यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटासमोर विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. या निवडणुकीत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधान परिषद आमदार सत्यजित तांबे, विवेक कोल्हे, खासदार निलेश लंके, आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी मंत्री शंकरराव गडाख, आमदार मोनिका राजळे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांच्या भूमिकांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अकोले तालुक्यातही या निवडणुकीची समीकरणे वेगाने बदलत आहेत. आमदार डॉ. किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, माजी चेअरमन सिताराम पाटील गायकर, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, तसेच जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक मधुकरराव नवले यांच्या राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अकोले तालुक्यासाठी जिल्हा बँकेत दोन जागा निश्चित असून अनुसूचित जमाती मतदारसंघातील जागेसाठी चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या जागेवर आमदार डॉ. किरण लहामटे आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे प्रत्येक मत निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाशी संबंधित पदाधिकाऱ्यांच्या मतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. अकोले तालुक्यात पत्रकार संघाच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा, शाळा व मंदिरांना साहित्य वाटप, गरजूंना किराणा किट, वस्त्रवाटप, एकल महिलांना जीवनावश्यक साहित्य वितरण, हरिपाठ पुस्तिका वाटप, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांमुळे पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जपली आहे.
राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रसिद्धीप्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, तालुका अध्यक्ष अशोक उगले, कार्याध्यक्ष दत्ता जाधव आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पत्रकारितेसोबत सामाजिक कार्याचीही प्रभावी परंपरा निर्माण केली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या भूमिकेकडे सर्वच राजकीय गटांचे लक्ष लागले असून ते कोणाच्या बाजूने मतदान करतात, यावर काही मतदारसंघांतील निकालाची दिशा अवलंबून राहू शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
एकूणच, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक ही केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांची मोठी परीक्षा ठरणार आहे. त्यात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांना मिळालेले प्रतिनिधित्व आणि पत्रकारांच्या मतांचे वाढलेले महत्त्व यामुळे यंदाची निवडणूक अधिकच रंगतदार आणि उत्सुकतेची ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.




