स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कोपरगावला ४०.४९ लाखांचा निधी मंजूर-नगराध्यक्ष संधान
स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कोपरगावला ४०.४९ लाखांचा निधी मंजूर-नगराध्यक्ष संधान
नवीन ६५ सीट्सच्या मुतारी सुविधेला शासनाची मान्यता; नगराध्यक्ष पराग संधान यांची माहिती
Kopargaon vijay kapse दि ११ ऑगस्ट २०२६ : शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कोपरगाव नगरपरिषदेला महत्त्वपूर्ण मंजुरी मिळाली आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत कोपरगाव नगरपरिषदेच्या नवीन ६५ सीट्सच्या मुतारी उभारणीच्या आराखड्यास शासनाची मान्यता मिळाली असून, त्यासाठी ४० लाख ४९ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष पराग संधान यांनी दिली.

शहरातील सार्वजनिक स्वच्छता सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यापूर्वी शहरात १५० सीट्सचे शौचालय मंजूर झाले असून, आता त्यामध्ये नवीन ६५ सीट्सच्या मुतारी सुविधेची भर पडणार आहे. त्यामुळे बाजारपेठ, गर्दीची ठिकाणे तसेच सार्वजनिक वापराच्या परिसरातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे.
आ. विवेकभैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुकीच्या काळात नागरिकांना विश्वासमानाच्या माध्यमातून दिलेल्या शब्दांची पूर्तता करण्याच्या दिशेने नगराध्यक्ष पराग संधान यांनी टाकलेले हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

स्वच्छता ही केवळ शहराच्या सौंदर्याशी संबंधित बाब नसून ती नागरिकांच्या आरोग्याशी थेट निगडित आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची संख्या वाढविणे, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देणे आणि शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावणे याला नगरपरिषदेकडून प्राधान्य दिले जात आहे.
मंजूर निधीचा योग्य व पारदर्शक पद्धतीने वापर करण्याची दक्षता घेतली जाणार आहे. संबंधित कामाची पूर्तता झाल्यानंतर उपयोगिता प्रमाणपत्र तसेच भौतिक व आर्थिक प्रगतीच्या आधारे पुढील निधी उपलब्ध होणार आहे.

कोपरगाव शहर स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी अधिक सुविधायुक्त करण्याच्या दिशेने हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, आगामी काळातही शहरातील मूलभूत नागरी सुविधांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले जातील, असे नगराध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले.



