निवडणुकीनंतर राजकीय जोडे बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र या : आ. विवेक कोल्हे

निवडणुकीनंतर राजकीय जोडे बाजूला ठेवून विकासासाठी एकत्र या : आ. विवेक कोल्हे
धामोरीतील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या नव्या व्यावसायिक गाळ्यांचे दिमाखात उद्घाटन; ४० उद्योजकांना मिळणार व्यवसायाची संधी
Kopargaon vijay kapse दि ११ ऑगस्ट २०२६ : निवडणुकीपुरते राजकारण हवे; मात्र निवडणूक झाल्यानंतर राजकीय जोडे बाजूला ठेवून गावाच्या विकासासाठी आणि गावहितासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. गावहिताचा कोणताही प्रश्न असो, तो सोडविण्यासाठी आमदार या नात्याने पहिले पाऊल आम्ही उचलू. गावाचा विकास आणि नागरिकांचे हित यालाच सर्वोच्च प्राधान्य राहील, अशी स्पष्ट ग्वाही आमदार विवेक कोल्हे यांनी दिली.
धामोरी (ता. कोपरगाव) येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने उभारण्यात आलेल्या नव्या व्यावसायिक गाळ्यांचे उद्घाटन १० ऑगस्ट रोजी प.पू. रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमात आमदार विवेकभैय्या कोल्हे बोलत होते.

४० उद्योजकांना रोजगाराची नवी संधी
सध्या सर्वत्र बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत धामोरी येथील श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टने उभारलेल्या व्यावसायिक गाळ्यांच्या माध्यमातून तब्बल ४० उद्योजकांना व्यवसायाची संधी उपलब्ध होणार आहे. स्थानिक युवक, छोटे व्यापारी आणि उद्योजकांना स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी या गाळ्यांचा मोठा फायदा होणार आहे.
श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टची स्थापना १९५४ साली झाली. गेल्या अनेक दशकांपासून ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक कार्याबरोबरच सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. ट्रस्टच्या कामकाजावर आजवर कोणतेही शिंतोडे उडालेले नाहीत किंवा ताशेरे ओढले गेलेले नाहीत, ही ट्रस्टच्या पारदर्शक आणि नियोजनबद्ध कारभाराची पावती असल्याचे आ. कोल्हे यांनी नमूद केले.
ट्रस्टच्या माध्यमातून आतापर्यंत ३१ व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले असून, आता नव्याने आणखी १० गाळे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर छोटे-मोठे व्यवसाय सुरू करण्यासाठी उद्योजकांना मोठी संधी निर्माण झाली आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी पाठपुरावा
मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे धामोरी परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पिकांचे आणि शेतीचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत मिळावी, यासाठी मंत्रिमहोदयांकडे विनंती करण्यात आली असून, त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आ. कोल्हे यांनी सांगितले.
श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टची सुमारे सात एकर जागा शिल्लक असून, या जागेचा भविष्यात गावाच्या विकासासाठी योग्य पद्धतीने उपयोग करता येऊ शकतो. धामोरी देवस्थान ट्रस्टने तालुक्यातील इतर गावांसमोर आदर्श निर्माण केला आहे, असेही त्यांनी सांगितले.

शासकीय योजनांचा लाभ युवकांनी घ्यावा
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिक, युवक आणि उद्योजकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी राज्यकर्ते आणि कार्यकर्ते म्हणून आपली आहे. शासनाच्या अनेक योजना असूनही माहितीअभावी काही नागरिक त्यापासून वंचित राहतात. त्यामुळे शासनाच्या योजना घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण आणि आपले कार्यकर्ते सतर्क राहून अधिक प्रभावीपणे काम करू, असे आ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.
जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून उद्योग-व्यवसायासाठी विविध योजना उपलब्ध आहेत. युवक आणि नवउद्योजकांनी या योजनांची माहिती घेऊन त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
शेतकऱ्यांसाठी उपबाजार समिती लवकरच सुरू करणार
आपला देश कृषिप्रधान असून ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य बाजारपेठ आणि योग्य भाव मिळणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून काही महिन्यांपूर्वी उपबाजार जाहीर करण्यात आला होता. या उपबाजाराच्या विषयावर काही प्रमाणात राजकारण झाले. मात्र, तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर तालुक्यातील सर्व नेत्यांच्या उपस्थितीत उपबाजार समितीचे भूमिपूजन करण्यात आले. त्यामुळे या उपबाजाराचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. उपबाजाराच्या माध्यमातून तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीमालाला योग्य भाव, बाजारपेठ आणि आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे भरती प्रक्रियेवर बंदी असल्याने मार्केट कमिटीला अधिकृत भरती करण्यास परवानगी मिळावी, यासाठी मंत्रिमहोदयांकडे विनंती करण्यात आली आहे. येत्या काही महिन्यांत कोपरगाव येथील उपबाजार सुरू करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले जाईल, असे ठाम आश्वासन आ. विवेक कोल्हे यांनी दिले.

विधानपरिषदेवर निवड झाल्याबद्दल सत्कार
विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल धामोरी ग्रामस्थांच्या वतीने आ. विवेकभैय्या कोल्हे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना त्यांनी धामोरीसह पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचे मनःपूर्वक आभार मानले.
गावाच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. विकासाच्या कामात राजकारण न आणता गावहिताला प्राधान्य दिल्यास धामोरीसह संपूर्ण पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास साधता येईल, असा संदेशही आ. कोल्हे यांनी यावेळी दिला.
या प्रसंगी श्री भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विलासराव भाकरे, उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, सचिव शिवाजीराव वाघ, विश्वस्त संपतराव भाकरे, विलासराव जगझाप, राहुल वाणी यांच्यासह प्रवीण जगन्नाथ शिंदे, कैलासराव माळी, अशोकराव भाकरे, बाजीराव मांजरे, विलासराव माळी, ज्ञानदेव मांजरे, नारायणराव मांजरे, मनोज जगझाप, सुनीलराव मांजरे, मनेषराव गाडे, विजयराव जाधव, अण्णा साळुंखे, भाऊसो भाकरे, सोपानराव कासार, विजुभाऊ गाडे, जयराम गडाख, रामराव जगताप, संजय बोडके, राजेंद्र कासार, लव्हाटे सर, भाऊसाहेब जाधव, बाळासाहेब अहिरे, डॉ. शिंदे, कैलासराव बारे, काकासाहेब वाघ, अविनाश अहिरे, विजयराव साळुंखे, नाजीमभाई शेख, प्रभाकर पारखे, लहू पवार, शंकरराव चव्हाण, श्रीरामराजे भोसले, नारायणराव भाकरे तसेच ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



