कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा काही दिवसांत बंदोबस्त करणार : आरोग्य सभापती वैभव आढाव
कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा काही दिवसांत बंदोबस्त करणार : आरोग्य सभापती वैभव आढाव
कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा काही दिवसांत बंदोबस्त करणार : आरोग्य सभापती वैभव आढाव

Kopargaon vijay kapse दि १२ ऑगस्ट २०२६: शहरातील प्रमुख रस्ते, चौक तसेच रहदारीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाची कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने दखल घेतली असून, काही दिवसांत मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येईल, अशी माहिती आरोग्य सभापती वैभव आढाव यांनी दिली.
मोकाट जनावरे पकडण्यासाठी नगरपरिषदेने दोन वेळा निविदा प्रसिद्ध केल्या. मात्र, या कामासाठी कोणत्याही ठेकेदाराने निविदा दाखल केली नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत मोकाट जनावरे पकडण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

शहरातील काही नागरिकांकडून रस्त्याच्या कडेला जनावरांसाठी चारा टाकला जातो. या चाऱ्याच्या लोभापोटी मोठ्या संख्येने जनावरे मुख्य रस्त्यांवर ठाण मांडून बसतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढतो. पादचारी, दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे रस्त्यावर चारा टाकणाऱ्या नागरिकांवर नाईलाजास्तव कायदेशीर कारवाई करावी लागू शकते, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाने केले आहे.

मोकाट जनावरांचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध प्राणीप्रेमी संस्था व सामाजिक संघटनांनाही सहकार्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने स्वतःच्या पातळीवर आवश्यक उपाययोजना करून हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरिकांची सुरक्षितता आणि शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवणे ही नगरपरिषदेची जबाबदारी आहे. मोकाट जनावरांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येत असून, काही दिवसांत हा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लावला जाईल, असे आरोग्य सभापती वैभव आढाव यांनी सांगितले.
तसेच नागरिकांनी रस्त्यावर जनावरांसाठी चारा टाकू नये आणि नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



