कोपरगावात १५ व १६ ऑगस्टला भरणार ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ

कोपरगावात १५ व १६ ऑगस्टला भरणार ‘अमृतपेठ थेट बाजारपेठ
स्वदेशी व दर्जेदार उत्पादनांची भव्य बाजारपेठ; ग्राहकांना एकाच छताखाली मिळणार विविध वस्तू
Kopargaon vijay kapse दि १३ ऑगस्ट २०२६– महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात ‘अमृत’ या स्वायत्त संस्थेच्या वतीने स्थानिक उत्पादक व लघुउद्योजकांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘अमृतपेठ – थेट बाजारपेठ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन कोपरगाव येथे करण्यात आले आहे. शनिवार १५ व रविवार १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत व्यापारी धर्मशाळा, बसस्थानकासमोर, कोपरगाव येथे ही बाजारपेठ भरणार आहे.

अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या अमृतपेठेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर आता कोपरगावमध्ये पुन्हा या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वदेशी, दर्जेदार आणि स्थानिक उद्योजकांनी तयार केलेली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणे, हे अमृतपेठेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
या बाजारपेठेत ग्राहकांना नाचणी व शेंगदाणा लाडू, चकली, विविध प्रकारचे पापड व शेव, लोणची, खाकरा, विविध मसाले, बाकरवडी, ढोकळा व आईसक्रीम प्रीमिक्स यांसह खाद्यपदार्थांची मोठी विविधता उपलब्ध होणार आहे.

तसेच हँडमेड मॅट, रांगोळी, आर्ट व क्राफ्ट वस्तू, मोती व ज्वेलरी, नथ, अमेरिकन डायमंड ज्वेलरी, माहेश्वरी व विविध प्रकारच्या साड्या, कुर्ती, हँडमेड साडी-ब्लाउज, बॅग, साडी कव्हर, देवाचे वस्त्र, मोतींपासून तयार केलेल्या शोभेच्या वस्तू आदींचे स्टॉलही असणार आहेत.
आरोग्य व दैनंदिन वापराच्या वस्तूंमध्ये आयुर्वेदिक साबण, फेसवॉश, परफ्युम, स्किन व हेअर केअर उत्पादने, साफसफाईचे साहित्य, वॉटरप्रूफिंग तसेच सोलर पॅनल यांसह विविध उत्पादने ग्राहकांना पाहता व खरेदी करता येणार आहेत.

लघुउद्योजकांसाठी अमृतपेठ हे आपली उत्पादने थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरत आहे. या उपक्रमामुळे उत्पादकांना बाजारपेठ तर ग्राहकांना दर्जेदार स्वदेशी उत्पादने उपलब्ध होत असल्याने दोन्ही घटकांना त्याचा फायदा होत आहे.
विशेष म्हणजे, विविध शासकीय योजनांची माहिती देणारा तसेच इच्छुकांची नोंदणी करून घेणारा स्वतंत्र स्टॉल देखील अमृतपेठेत असणार आहे.
कोपरगावातील नागरिकांनी कुटुंबासह या बाजारपेठेला भेट देऊन स्वदेशी व स्थानिक उत्पादने खरेदी करण्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी केले आहे. तसेच ब्राह्मण सभा, कोपरगावचे अध्यक्ष मकरंद को-हाळकर व प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक यांनीही नागरिकांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
अमृतचे व्यवस्थापक सागर भोपे, अमृतमित्र संदीप देशपांडे यांच्यासह आयोजकांकडून अमृतपेठ यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
📍 स्थळ : व्यापारी धर्मशाळा, बसस्थानकासमोर, कोपरगाव
📅 दिनांक : १५ व १६ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ : सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत



