आपला जिल्हा

कोपरगावात मोकाट जनावरांनी घेतला दुसरा  बळी; कोपरगावकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कोपरगावात मोकाट जनावरांनी घेतला दुसरा  बळी; कोपरगावकरांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

 विद्यार्थी,महिला, ज्येष्ठ नागरिकांमध्ये पसरले भीतीचे वातावरण

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि १६ ऑगस्ट २०२६ :- कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या मोकाट जनावरांमुळे नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी मोकाट जनावराच्या धडकेत एका निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतरही निष्काळजी प्रशासनाने परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न केल्यामुळे काही दिवसांपूर्वी मोकाट जनावराच्या धडकेत जखमी झालेल्या आणखी एका व्यक्तीचा रविवार (दि.१६) रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने कोपरगावकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

जाहिरात

या सलग दोन दुर्दैवी घटनांमुळे कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांचा प्रश्न केवळ वाहतुकीच्या अडथळ्यापुरता मर्यादित राहिलेला नसून, तो थेट नागरिकांच्या सुरक्षेपर्यंत जाऊन पोहोचला असून नागरिकांचे कोपरगावच्या रस्त्यावर फिरणे मुश्किल झाले आहे. विशेषतः शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, चौक आणि वर्दळीच्या भागात जनावरांचे कळप रस्त्यावर ठाण मांडून बसलेले किंवा घोळक्याने उभे असतात. त्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी तसेच वाहन चालकांना या जनावरांना पार करून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.

जाहिरात

मोकाट जनावरांमुळे सर्वाधिक धोका महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांना निर्माण झाला आहे. अचानक समोर आलेल्या जनावरामुळे वाहनाचा तोल जाणे, अपघात होणे किंवा जनावराने थेट धडक देणे अशा घटना घडण्याची शक्यता कायम आहे. परिणामी, सकाळ-संध्याकाळ घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना चालण्यासाठी बाहेर पडतानाही सावधगिरी बाळगावी लागत असून यापुढे घराबाहेर पडायचे की नाही? असा प्रश्न पडला आहे.

एक घटना घडल्यानंतर देखील पालिका प्रशासनाने कोणत्याही प्रभावी उपाययोजना न केल्यामुळे पुन्हा एका निरपराध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे कोपरगावकरांमध्ये नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात नाराजी वाढली आहे. मागील महिन्यात मोकाट जनावरांमुळे निष्पाप बळी गेल्यानंतर नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाकडे मोकाट जनावरांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र कोपरगाव नगरपालिकेने या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यामुळे आणखी एका निरपराध व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला याला जबाबदार कोण? असा प्रश्न कोपरगावकर नगरपालिकेला विचारीत आहे. 

दोन निरपराध नागरिकांचा जीव गेल्यानंतरही जर नगरपालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर भविष्यात आणखी एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे कोपरगाव नगरपालिका मोकाट जनावरांबाबत उपाययोजना कधी करणार? व त्यासाठी आणखी किती बळी घेणार? हा प्रश्न आता सर्वसामान्य कोपरगावकरांकडून उपस्थित केला जात असून निष्काळजी प्रशासनाने नागरिकांच्या जीवित सुरक्षेला प्राधान्य देत तातडीने ठोस आणि कायमस्वरूपी उपाय योजना करावी अशी मागणी कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे