आपला जिल्हा

डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून मुलींच्या स्वसंरक्षणासाठी मुक्कामार अभियान – अभिनेत्री इशिता शर्मा

मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान; संगमनेर तालुक्यातील २७ विद्यालयांमध्ये वर्षभर प्रशिक्षण

मुलींच्या स्वसंरक्षणासाठी ‘मुक्कामार’ अभियान; संगमनेर तालुक्यातील २७ विद्यालयांमध्ये वर्षभर प्रशिक्षण

Sangmner vijay kapse दि १८ ऑगस्ट २०२६ : मुली व महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर मुलींमध्ये आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि स्वसंरक्षणाची क्षमता निर्माण करण्यासाठी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेर तालुक्यातील २७ विद्यालयांमध्ये ‘मुक्कामार’ स्वसंरक्षण अभियान राबविण्यात येणार आहे. प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेत्री तथा मुक्कामार फाउंडेशनच्या संस्थापक इशिता शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींना वर्षभर स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

जाहिरात

वडगावपान येथील डी. के. मोरे जनता विद्यालयात एकविरा फाउंडेशन आणि मुक्कामार फाउंडेशन यांच्यात मुलींना वर्षभर प्रशिक्षण देण्याबाबत सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, अभिनेत्री इशिता शर्मा, एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. तब्बल १५०० विद्यार्थिनींच्या उपस्थितीत हा उपक्रम जाहीर करण्यात आला.

यावेळी बोलताना अभिनेत्री इशिता शर्मा म्हणाल्या, “देशात महिला व मुलींवरील अत्याचारांच्या घटना वाढत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मुलींनी आत्मनिर्भर होण्याबरोबरच स्वतःचे संरक्षण करण्यासाठी सक्षम झाले पाहिजे. मुक्कामार फाउंडेशनच्या माध्यमातून मुलींना खेळाडू व फायटर म्हणून घडविण्यासाठी वर्षभर प्रशिक्षण दिले जाणार आहे. डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या संकल्पनेतून संगमनेरमध्ये सुरू झालेला हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी दिशादर्शक ठरेल.”

जाहिरात

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, मुलींनी चांगला आहार घेऊन शरीर तंदुरुस्त ठेवण्याबरोबरच स्वतःमध्ये धाडस निर्माण केले पाहिजे. कुणी त्रास देत असल्यास तो प्रकार लपवून न ठेवता तातडीने शाळा प्रशासन किंवा पोलिसांकडे तक्रार करावी. चुकीच्या गोष्टींना संगमनेर तालुक्यात कधीही पाठीशी घातले जाणार नाही.

डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. ‘मुक्कामार’ अभियानातून मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण मिळणार असून २७ विद्यालयांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. सर्व विद्यार्थिनींनी निर्भीडपणे या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

जाहिरात

सौ. दुर्गाताई तांबे यांनीही मुली व महिलांवरील वाढते अत्याचार ही चिंताजनक बाब असल्याचे सांगत स्वसंरक्षण प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास व धाडस निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असे नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. जयश्री थोरात यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले, तर बाबासाहेब मोहोळ यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, पालक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 ‘वडगावपानमधील अॅसिड हल्ल्याचा आरोपी अद्याप फरार, ही दुर्दैवी बाब’

७ मार्च रोजी वडगावपान येथील चिमुकलीवर अॅसिड हल्ला झाला होता. घटनेला पाच महिने उलटूनही आरोपी पोलिसांना सापडलेला नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महिला व मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. वडगावपान येथील अॅसिड हल्ल्यातील आरोपीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली.

 २७ विद्यालयांमध्ये वर्षभर प्रशिक्षण

संगमनेर तालुक्यातील २७ विद्यालयांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रत्येक आठवड्याला तीन तास प्रशिक्षण घेण्यात येणार असून प्रत्येक शाळेतील तीन शिक्षकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. वर्षभर हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यानंतर महाविद्यालयांमध्येही ‘मुक्कामार’ अभियान सुरू करण्यात येणार आहे. मुलींना आत्मनिर्भर आणि स्वसंरक्षणासाठी सक्षम बनविणारा हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास अभिनेत्री इशिता शर्मा यांनी व्यक्त केला.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे