आपला जिल्हा

समता स्कूलमध्ये योगासन स्पर्धेत युवा कर्तृत्वाने गाठली नवी उंची

समता स्कूलमध्ये योगासन स्पर्धेत युवा कर्तृत्वाने गाठली नवी उंची
समता स्कूलमध्ये योगासन स्पर्धेत युवा कर्तृत्वाने गाठली नवी उंची
kopargaon vijay kapse दि २० ऑगस्ट २०२६: समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात अहिल्यानगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वी जिल्हास्तरीय योगासन स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धा २०२६–२७ उत्साह, शिस्त आणि क्रीडाविष्काराच्या वातावरणात १६ व १७ ऑगस्ट २०२६ रोजी समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या स्पर्धेच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या युवा योगासनपटूंनी विलक्षण लवचिकता, शारीरिक सामर्थ्य, अचूक संतुलन, मानसिक एकाग्रता आणि आत्मविश्वासाचे प्रभावी दर्शन घडविले.

जाहिरात
कार्यक्रमाच्या सुरुवातीला समता इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य समीर अत्तार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत व परिचय करून दिला. शिर्डी मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसेच मालपाणी उद्योग समूह अध्यक्ष डॉ.संजय मालपाणी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पारितोषिक वितरणासाठी शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक अमित शेळके, योग प्रशिक्षक उत्तमभाई शहा, अभिजीत शहा, सतीश गुजराथी, महेश थोरात, आदिनाथ ढाकणे, समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे, समता स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त सौ.स्वाती कोयटे उपस्थित होते.

जाहिरात
दरम्यान, समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात दोन दिवस रंगलेल्या या योगासन स्पर्धेमुळे परिसरात उत्साहाचे आणि क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. पारंपरिक योगासनासोबतच आर्टिस्टिक योगासन सिंगल, आर्टिस्टिक योगासन पेअर, रिदमिक योगासन पेअर, ट्रेडिशनल ग्रुप आणि आर्टिस्टिक ग्रुप अशा विविध प्रकारांत खेळाडूंनी आपले कौशल्य सादर केले. आसनातील अचूकता, शरीराचा समतोल, लवचिकता, तालबद्धता आणि सादरीकरणातील सफाई यांचा सुरेख मिलाफ प्रत्येक सादरीकरणातून जाणवत होता.

जाहिरात
स्पर्धेच्या अंतिम निकालात संगमनेर तालुक्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले. अहिल्यानगर तालुक्याने द्वितीय, तर अकोले तालुक्याने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या संघांसह सहभागी सर्व खेळाडूंचे मान्यवरांनी अभिनंदन केले.
प्रसंगी संजय मालपाणी म्हणाले की, “योग ही केवळ शरीर तंदुरुस्तीची साधना नसून मनाला स्थैर्य, विचारांना सकारात्मक दिशा आणि जीवनाला शिस्त देणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांनी योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावा. समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना योग आणि क्रीडा क्षेत्रात मिळणाऱ्या संधी कौतुकास्पद असून, अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाला निश्चितच आकार मिळतो. तसेच त्यांनी ” समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये योग व क्रीडा क्षेत्राला दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनाचे कौतुक करत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीला दाद दिली.
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे सांगत शिक्षणासोबत योग आणि क्रीडेलाही जीवनाचा भाग बनविण्याचे आवाहन केले. योगामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संयम, एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत क्रीडा क्षेत्रातही सातत्याने सहभाग घेऊन आपले व्यक्तिमत्त्व घडवावे, असे त्यांनी सांगितले.
स्कूलच्या कार्यकारी विश्वस्त  स्वाती कोयटे यांनी योगामुळे शरीर सुदृढ, मन स्थिर आणि व्यक्तिमत्त्व आत्मविश्वासपूर्ण बनत असल्याचे सांगत विजयापेक्षा सातत्य, जिद्द आणि प्रयत्न अधिक महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले.
योगासनाच्या या क्रीडामय सोहळ्याला सांस्कृतिक रंगतही लाभली. आदित्य सूर्यवंशी व गार्गी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बहारदार नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षिका कविता पाटील, विभावरी नगरकर, शुभम औताडे आदींसह समता इंटरनॅशनल स्कूलच्या सर्व क्रीडा शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्वेताली सदाफळ यांनी केले. उपप्राचार्य मोहिनी जगताप यांनी उपस्थितांचे आभार मानले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे