शिर्डीत ‘बीबीएनजी स्काय’ चॅप्टरचा शानदार शुभारंभ

शिर्डीत ‘बीबीएनजी स्काय’ चॅप्टरचा शानदार शुभारंभ
शिर्डी–कोपरगाव–येवला परिसरातील उद्योजकांसाठी व्यवसायवृद्धीचे नवे व्यासपीठ
Kopargaon vijay kapse दि. ६ सप्टेंबर २०२६ : ब्राह्मण उद्योजकांचे जागतिक स्तरावरील नेटवर्क असलेल्या बीबीएन ग्लोबल अंतर्गत ‘बीबीएनजी स्काय’ (शिर्डी–कोपरगाव–येवला) चॅप्टरचा भव्य शुभारंभ रविवारी शिर्डी येथील अगत्य ॲग्रो टुरिझम येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

बीबीएनजी ग्लोबल ही संस्था ३० पेक्षा अधिक देशांमध्ये कार्यरत असून, ९० हजारांहून अधिक व्यावसायिक व उद्योजक या नेटवर्कशी जोडले गेले आहेत. या माध्यमातून शिर्डी, कोपरगाव व येवला परिसरातील उद्योजकांना परस्पर व्यावसायिक सहकार्य, मार्गदर्शन आणि व्यवसायवृद्धीसाठी नवे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

कार्यक्रमाचे मुख्य वक्ते केंद्रीय एमएसएमई बोर्डाचे सदस्य, उद्योगमित्र व बीबीएनजीचे सल्लागार प्रदीप पेशकार यांनी ‘सरकारच्या धोरणानुसार व्यवसाय करून व्यवसाय दहापट कसा वाढवायचा?’ तसेच ‘उद्योगासाठी आर्थिक तरतूद’ या विषयांवर मार्गदर्शन केले. बदलत्या व्यावसायिक वातावरणात शासकीय धोरणांचा प्रभावी वापर, आर्थिक नियोजन आणि व्यवसायवृद्धीचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.

या सोहळ्यास बीबीएनजीचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सरचिटणीस संचालक अरविंद कोऱ्हाळकर, सहयोगी संचालक (विकास) डॉ. अभिजित चांदे, सहयोगी संचालक (वित्त) महेश देशपांडे, कोपरगाव ब्राह्मण सभेचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर आणि ब्राह्मण एकता मंच, शिर्डीचे धनंजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोपरगाव चॅप्टरच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा
कार्यक्रमात कोपरगाव चॅप्टरच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. चॅप्टर प्रमुख म्हणून गौरव कोऱ्हाळकर, सेक्रेटरी म्हणून अभिषेक कुर्लेकर आणि ट्रेझरर म्हणून नितीन जोशी (जोशीज् ट्रेडर्स) यांची निवड करण्यात आली. चॅप्टरचे पालक (गार्डियन) बाळकृष्ण कुलकर्णी यांचे मार्गदर्शन या कार्यकारिणीला लाभणार आहे.
‘बीबीएनजी स्काय’ चॅप्टरमध्ये डिजिटल, हर्बल, स्पिरिच्युअल यांसह विविध क्षेत्रांतील व्यवसायांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रिजनल हेड रासिका कुलकर्णी आणि डेव्हलपमेंट कोऑर्डिनेटर डॉ. संदीप चिंचोलीकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
‘नोकरी शोधणारा नव्हे, रोजगार निर्माण करणारा समाज घडवूया’
बीबीएनजीचे संस्थापक अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी उद्योजकतेचा व्यापक दृष्टिकोन मांडताना केवळ स्वतः व्यवसाय करण्यापुरते मर्यादित न राहता व्यवसाय वाढवून इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे आवाहन केले.
तरुणांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता उद्योजकतेकडे वळावे, नवीन व्यवसाय सुरू करावेत, विद्यमान व्यवसायाचा विस्तार करावा आणि आर्थिक स्वावलंबन साधावे, यासाठी बीबीएनजीसारखे व्यासपीठ महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
शिर्डी–कोपरगाव–येवला परिसरातील युवक, उद्योजक व विविध क्षेत्रांतील व्यावसायिकांना एका व्यासपीठावर आणून परस्परांना ग्राहक, मार्गदर्शन आणि सहकार्य उपलब्ध करून देण्याचा या चॅप्टरचा उद्देश आहे. ‘एकमेकांना जोडणे, एकमेकांकडून शिकणे आणि एकमेकांना पुढे नेणे’ या विचारातून परिसराची आर्थिक प्रगती साध्य होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
कोपरगाव ब्राह्मण सभा, येवला आणि संबंधित संस्थांच्या सहकार्याने साकारलेल्या या उपक्रमामुळे परिसरातील उद्योजक व व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होणार असून, ‘नोकरी शोधणारा नव्हे, तर रोजगार निर्माण करणारा समाज घडविण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल’ म्हणून या उपक्रमाकडे पाहिले जात आहे.



