संगमनेर शहर २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणात नगरपरिषदेकडून सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य : माजीमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर शहर २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नियंत्रणात
नगरपरिषदेकडून सुविधा आणि विकासकामांना प्राधान्य : माजीमंत्री बाळासाहेब थोरात
आगामी पाच वर्षांत अभिमान वाटेल असे काम करू : आ. सत्यजित तांबे
Sangmner vijay kapse दि ८ सप्टेंबर २०२६ : संगमनेर नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात नागरिकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच दर्जेदार विकासकामांना प्राधान्य दिले जात आहे. शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अद्ययावत २०० सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित करण्यात आले असून, यामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे. नगरपरिषदेच्या कामांमध्ये नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे राष्ट्रीय वर्किंग कमिटी सदस्य तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरातील २०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि फूड कोर्टचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई मालपाणी, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख यांच्यासह नगरसेवक व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

माजीमंत्री थोरात म्हणाले, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी १९९२ मध्ये नगराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर संगमनेर शहराच्या विकासाला नवे पर्व सुरू झाले. त्यानंतर शहराने विकासाची सातत्यपूर्ण वाटचाल केली आहे. निळवंडे धरणाच्या दोन्ही कालव्यांबरोबरच थेट पाइपलाइनमुळे शहराला मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. ग्रामीण भागातील शेती व भाजीपाला व्यवसाय वाढत असल्याने त्याचा फायदा शहरातील बाजारपेठेलाही होणार आहे.

नगरपरिषदेच्या नव्या टीमने मागील आठ महिन्यांत चांगले काम केले आहे. सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, रस्ते आणि भूमिगत विद्युत व्यवस्था यावर आगामी काळात अधिक भर देण्याची गरज आहे. नागरिकांच्या सहभागातून शहर अधिक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. विकासकामे करताना अडथळे येतील; मात्र काम थांबवू नये, असे आवाहनही थोरात यांनी केले.
शहराच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित झाली असून, पोलिसांनी या कार्यक्रमाला उपस्थित न राहणे हे न उलगडणारे कोडे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

निधी आणण्याची आम्हाला चांगली माहिती : आ. सत्यजित तांबे
आमदार सत्यजित तांबे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांतून शहरासाठी थेट पाइपलाइन योजना साकारली आणि त्यामुळे आज शहराला मुबलक पाणी मिळत आहे. शहरात उच्च दर्जाचे २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समिती व पालकमंत्र्यांनी दिलेल्या निधीबद्दल त्यांनी आभार मानले.
या कामाचे श्रेय विरोधकांनी घेऊ नये, असा टोला लगावत तांबे म्हणाले की, न आणलेल्या निधीचे आणि न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. निधी कसा आणायचा हे आम्हाला चांगले माहिती आहे. शहराच्या विकासासाठी निधी आणत राहू आणि काम करत राहू.
संगमनेरमध्ये २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह ११ चौकांमध्ये माहिती देणारे स्पीकर बसविण्यात आले आहेत. दिवाळीच्या काळात धुळमुक्त शहरासाठी धूळमुक्त मशीनही घेण्यात येणार आहेत. आगामी पाच वर्षांत संगमनेर शहराचा असा विकास करू की, प्रत्येक नागरिकाला त्याचा अभिमान वाटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिलांच्या सुरक्षेसाठी रक्षक दल, भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि ई-टॉयलेटची सुविधा सुरू करण्यात आल्याचे नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी सांगितले. ‘स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर’ या संकल्पनेत नागरिकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शहरातील विविध ठिकाणी उद्घाटन सोहळे उत्साहात पार पडले. नागरिक, महिला व युवकांची मोठी उपस्थिती होती. आमदार सत्यजित तांबे व नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी स्कूटरवरून शहरातून फेरी काढली. विविध ठिकाणी युवकांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणार
संगमनेर हायटेक बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्यासाठी परिवहन विभागाकडून जागा हस्तांतरित करण्यात आली आहे. या ठिकाणी आगामी काळात भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, तिरंगा ध्वज आणि शहीद स्मारक नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात येणार आहे.
या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचे आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते स्मारकांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले. स्मारकांसाठी संग्राम पतसंस्थेच्या वतीने ५ लाख रुपये, तर किसनभाऊ हासे युवावार्ता परिवाराच्या वतीने ११ हजार रुपयांची लोकवर्गणी देण्यात आली.








