नाविन्यपूर्ण संशोधन आणि प्रभावी अंमलबजावणीतून सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करा;- जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील

नाविन्यपूर्ण संशोधन आणि प्रभावी अंमलबजावणीतून सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करा;– जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील
अभियंता गौरव पुरस्कारांचे वितरण
Shirdi vijay kapse दि. १६ सप्टेंबर २०२६– “नाविन्यपूर्ण संशोधन आणि प्रभावी अंमलबजावणीमध्ये अभियंत्यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवला, तरच सिंचन व्यवस्था अधिक सक्षम होऊन दुष्काळी भागाच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतील,” असे मत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.

जलसंपदा विभागाच्या वतीने यशवंतराव चव्हाण विकास व प्रशासन प्रबोधिनी येथे आयोजित ‘अभियंता गौरव पुरस्कार’ सोहळ्याचे वितरण जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी जलसंपदा मंत्री तथा विद्यमान मंत्री ना. गिरीष महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, प्रकल्प समन्वय सचिव जयंत बोरकर, लाभक्षेत्र विकास विभागाचे सचिव प्रकाश मिसाळ, विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश सोनटक्के, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हनुमंत धुमाळ, गोदावरी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी, कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक सुदर्शन पगार, तापी खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक राजेश मोरे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री ना. विखे पाटील म्हणाले की, राज्यातील शेती आणि जलव्यवस्थेसाठी अभियंत्यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव होत असून, जलसंपदा विभागातील अनुभवी अधिकारी व अभियंत्यांनी प्रदीर्घ काळात केलेल्या कामामुळेच राज्याच्या सिंचन क्षेत्रात भरीव सुधारणा होत आहे.
राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यापूर्वी फक्त या गोष्टी ऐकायला मिळत होत्या, मात्र समुद्रात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्याच्या धोरणात्मक निर्णयाला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. अनेक वर्षांपासून दुष्काळी भागातील शेतकरी पाण्यासाठी संघर्ष करीत आहेत; अशा वेळी उल्हास खोरे आणि वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाबाबत झालेला निर्णय बळीराजाला मोठा दिलासा देणारा आहे, असे मंत्री विखे पाटील म्हणाले. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सिंचन व्यवस्था अधिक सक्षम करावी लागेल. यासाठी अभियंत्यांनी केवळ तांत्रिक चौकटीत न राहता व्यापक दृष्टिकोन ठेवून काम करावे आणि नाविन्यपूर्ण संशोधन व अंमलबजावणीवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे त्यांनी सूचित केले.
विभागातील निवृत्त अभियंत्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ शासनाला सातत्याने मिळत राहणे आवश्यक आहे; यासाठी जलसंपदा विभागात एक ‘सल्लागार मंडळ’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली. याच सोहळ्यात जलसंपदा विभागातील पुरस्कारांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली होती; त्यास तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत ना. विखे पाटील यांनी प्रत्येक महामंडळासाठी किमान तीन पुरस्कार देण्याची सूचना केली. पुढील वर्षापासून प्रत्येक महामंडळासाठी ३ ते ५ पुरस्कार ठेवण्यास आपली मंजुरी असल्याचे त्यांनी जाहीर केले.

या वेळी बोलताना मंत्री ना. गिरीष महाजन म्हणाले की, जलसंपदा विभागातील अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे महाराष्ट्राच्या जलविकासाला मोठी चालना मिळाली आहे. धरणे बांधण्याबरोबरच त्यातील पाणी शेवटच्या शेतकऱ्याच्या शेतांपर्यंत पोहोचविणे आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा कार्यक्षम वापर करणे हेच आपल्या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असले पाहिजे. जलसंपदा विभाग हा राज्याच्या विकासाचा मुख्य कणा आहे. पाईपद्वारे वितरण प्रणाली, ठिबक व तुषार सिंचनामुळे पाण्याची गळती व बाष्पीभवन कमी करण्यावर अधिक भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. धरणांतील गाळ काढणे, वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार ही भविष्यातील महत्त्वाची आव्हाने आहेत. हा पुरस्कार म्हणजे संपूर्ण जलसंपदा विभागाच्या टीमवर्कचा गौरव असून, या पुरस्कारानंतर सर्वांची जबाबदारी अधिक वाढते, असेही महाजन यांनी नमूद केले.
जलप्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी भूसंपादन, वन व पर्यावरण मंजुरी तसेच पुनर्वसनाच्या बाबींचे प्रभावी नियोजन करून, ते बांधकामाच्या कामांसोबत समन्वयाने पूर्ण करावे, असे आवाहन विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी केले. जलसंपदा विभागातील सुमारे सहा हजार तांत्रिक मनुष्यबळाला योग्य प्रोत्साहन मिळण्यासाठी अभियंता पुरस्कारांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जलसंवर्धन, पाणी व्यवस्थापन, जलवापर संस्थांचे प्रशिक्षण, सिंचन वाढ आणि लोकसहभागासाठी विशेष नियोजन करण्याचे आवाहनही डवले यांनी केले. कार्यक्रमात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या अभियंता दिनानिमित्तच्या शुभेच्छा संदेशाची चित्रफीत दाखविण्यात आली, तसेच ‘राष्ट्रीय जल पुरस्कार २०२४’ मध्ये महाराष्ट्राला ‘सर्वोत्कृष्ट राज्य’ पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
अभियंता गौरव पुरस्कार
या वेळी २०१९ ते २०२४ या कालावधीतील वैयक्तिक व सांघिक पुरस्कारार्थींचा गौरव करण्यात आला. यामध्ये २०१९ चे वैयक्तिक पुरस्कारार्थी प्रकाश बाबूराव भोसले, प्रवीण पांडुरंग पारस्कर तसेच सांघिक पुरस्काराचे सांगली पाटबंधारे मंडळ; २०२० चे वैयक्तिक पुरस्कारार्थी निलेश गुरुनाथ भोईर, सचिन पुंडलिक पवार, मंगेश त्र्यंबकराव त्रिपिटे तसेच सांघिक पुरस्काराचे जिगाव प्रकल्प, बुलढाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळ; २०२१ चे वैयक्तिक पुरस्कारार्थी समाधान धोंडीबा सर्पेलवार, अरुण रामचंद्र नाईक, सायली राजेंद्र पाटील, प्रमोद पुंजाजी महाले, विजय हरी पाटील तसेच सांघिक पुरस्काराचे मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक; २०२२ चे वैयक्तिक पुरस्कारार्थी संजीव दगडू चोपडे, गोकुळ श्रावण महाजन, प्रवीण वसंतराव देशमुख, धनंजय महादेव कोकरे, जयपाल संजय चौरासिया तसेच सांघिक पुरस्काराचे रत्नागिरी पाटबंधारे मंडळ आणि नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, २०२३ चे वैयक्तिक पुरस्कारार्थी अजित भारत गौड तसेच सांघिक पुरस्काराचे जल हवामान आधार सामग्री प्रक्रिया विभाग, नाशिक आणि २०२४ चे वैयक्तिक पुरस्कारार्थी अनिता उदय पराते व राजरत्न महादेवराव रणदिवे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी जलसंपदा विभागातील अधिकारी, त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.




