राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत पार्थ भिंगारेचे दमदार यश

राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेत पार्थ भिंगारेचे दमदार यश
सोळावे स्थान पटकावत संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलसह करंजी गावाचा नावलौकिक
Kopargaon vijay kapse दि १६ सप्टेंबर २०२६: सहकार महर्षी शंकरराव कोल्हे यांनी दूरदृष्टीने स्थापन केलेल्या संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या करंजी येथील पार्थ चंद्रकांत भिंगारे याने अमरावती येथे झालेल्या ३४ व्या राज्यस्तरीय ज्युनिअर तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सोळावे स्थान पटकावले. त्याच्या या यशामुळे शाळेसह करंजी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

अमरावती जिल्हा तलवारबाजी संघटना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ते १३ सप्टेंबर २०२६ दरम्यान ही राज्यस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडली. राज्यभरातून १५० हून अधिक मुला-मुलींनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
या स्पर्धेत पार्थ भिंगारे याने संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक मोहसीन शेख व क्रीडा शिक्षक राहुल रुईकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या सामन्यांत त्याने कौशल्यपूर्ण व आत्मविश्वासपूर्ण तलवारबाजीचे प्रदर्शन करत राज्यात सोळावे स्थान मिळविले.

अल्पावधीतच तलवारबाजीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पार्थच्या या यशाचे शाळा व्यवस्थापन, शिक्षक, करंजी ग्रामस्थ तसेच तलवारबाजीप्रेमी नागरिकांनी कौतुक केले. त्याचे अभिनंदन करून आगामी स्पर्धांसाठी भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.








