ग्रामीण खेळाडूंच्या कौशल्यांना योग्य दिशा हवी : सुमित कोल्हे

ग्रामीण खेळाडूंच्या कौशल्यांना योग्य दिशा हवी : सुमित कोल्हे
संजीवनी सैनिकी स्कूलमध्ये तालुकास्तरीय फुटबॉल सामन्यांचे उद्घाटन; १२ संघांचा सहभाग
Kopargaon vijay kapse दि १७ सप्टेंबर २०२६: ग्रामीण भागातील खेळाडू आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड कौशल्य दडलेले आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण, आवश्यक सुविधा आणि प्रोत्साहन मिळाल्यास ते राष्ट्रीय स्तरावर आपल्या गुणवत्तेची प्रभावी छाप उमटवू शकतात. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सुप्त प्रतिभेला योग्य दिशा मिळाल्यास ते देशपातळीवर सर्वोच्च स्थान मिळवू शकतात. याचे ज्वलंत उदाहरण संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या ब्रास बँड पथकाने देशात अव्वल क्रमांक पटकावून दाखवून दिले आहे, असे प्रतिपादन संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी केले.

क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर यांच्या अंतर्गत कोपरगाव तालुका क्रीडा समितीच्या वतीने संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मैदानावर १९ वर्षांखालील वयोगटातील तालुकास्तरीय फुटबॉल सामन्यांचे उद्घाटन झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरून सुमित कोल्हे बोलत होते.
यावेळी कोपरगाव तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष नितीन निकम, डायरेक्टर ऑफ गव्हर्नन्स डी. एन. सांगळे, प्राचार्य कैलास दरेकर, कॅम्पस अॅडमिन विजय भास्कर तसेच विविध संघांचे टीम मॅनेजर्स उपस्थित होते. तालुक्यातील एकूण १२ संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.

सुमित कोल्हे म्हणाले की, फुटबॉल सामन्यात विजय मिळविण्यासाठी खेळाडूंना गोलचे ध्येय समोर ठेवून सातत्याने प्रयत्न करावे लागतात. त्याचप्रमाणे संजीवनी समूहाचे संस्थापक स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय निश्चित करून त्याच्या पूर्ततेसाठी आयुष्यभर कार्य केले. अध्यक्ष नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हा वारसा पुढे नेण्याचे कार्य सुरू आहे. युवकांनी शिक्षण, क्रीडा आणि विविध क्षेत्रांत मोठी झेप घ्यावी, यासाठी आवश्यक संधी, सुविधा व व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

संजीवनी सैनिकी स्कूलला भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्राप्त झालेली १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात वापरण्यात आलेली टी-५५ रणगाडा वॉर ट्रॉफी ही राष्ट्रप्रेम, शौर्य व कर्तृत्वाची प्रेरणादायी साक्ष आहे. या ऐतिहासिक स्मृतीतून युवकांनी देशभक्ती, शिस्त आणि जिद्दीची प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही कोल्हे यांनी केले.
तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष नितीन निकम म्हणाले की, ग्रामीण खेळाडूंना हिरव्यागार लॉनने सजलेल्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणे ही कौतुकाची बाब आहे. “खेळ हा आयुष्य जगायला शिकवतो. पराभवातून आपल्या त्रुटी शोधून पुढील यशाची तयारी करावी,” असा संदेश त्यांनी खेळाडूंना दिला.

डी. एन. सांगळे यांनी खेळाडूंनी सदैव खिलाडूवृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. टीम मॅनेजर प्रा. अमोल ठोंबरे यांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना उपलब्ध असलेल्या शासकीय नोकरीच्या संधींबाबत माहिती दिली.
प्राचार्य कैलास दरेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संजीवनी सैनिकी स्कूलचा विद्यार्थी राघवेंद्र पाठक याच्या विधिवत मंत्रोच्चाराने पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. स्कूलच्या ब्रास बँड पथकाने राष्ट्रगीत सादर केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.



