श्रीमद भागवत श्रवणासाठी जन्मोजन्मीचे पुण्य आवश्यक : महंत रामगिरी महाराज

श्रीमद भागवत श्रवणासाठी जन्मोजन्मीचे पुण्य आवश्यक : महंत रामगिरी महाराज
श्रीमद भागवत श्रवणासाठी जन्मोजन्मीचे पुण्य आवश्यक : महंत रामगिरी महाराज
Kopargaon vijay kapse दि १९ सप्टेंबर २०२६ :
श्रीमद् भागवत कथा श्रवण करण्यासाठी जन्मोजन्मीचे पुण्य असावे लागते. भगवंताची कृपा आणि संतांचा आशीर्वाद लाभल्याशिवाय भागवत श्रवणाची संधी प्राप्त होत नाही. वेदरूपी वृक्षाचे परिपक्व फळ म्हणजे श्रीमद् भागवत असून, त्याच्या श्रवणातून भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची अनुभूती मिळते, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.

गोदावरी बायो रिफायनरी लि. गणेश मंडळाच्या वतीने महंत रामगिरी महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. या कथेचा प्रारंभ भक्तिमय वातावरणात झाला. प्रारंभी श्रीमद् भागवत ग्रंथाचे पूजन, दीपप्रज्वलन आणि मंगलमय वातावरणात कथेला सुरुवात करण्यात आली.

यावेळी महंत रामगिरी महाराज म्हणाले की, श्रीमद् भागवत हे केवळ धार्मिक ग्रंथ नसून मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे आध्यात्मिक मार्गदर्शन आहे. वेदांचे सार, उपनिषदांचे तत्त्वज्ञान आणि भक्तीचा मधुर अनुभव श्रीमद् भागवतात एकवटलेला आहे. त्यामुळे भागवत कथा श्रवण करणे ही भगवंताची कृपा मानावी.
भागवताचे महात्म्य सांगताना महाराजांनी भक्ती, नामस्मरण आणि संतसंगतीचे महत्त्व विशद केले. जीवनातील दुःख, चिंता आणि मानसिक अस्वस्थता दूर करण्यासाठी भगवंताच्या नामाचा आधार घ्यावा. भागवत कथा मनुष्याला सदाचार, प्रेम, करुणा आणि परोपकाराची शिकवण देते. त्यामुळे प्रत्येकाने भागवत श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संचालक सुहास गोडगे, प्रवीण विभुते, मधुकर महाराज, रामभाऊ महाराज, चंद्रकांत महाराज, पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, नामदेव जाधव, शिवाजी ठाकरे, गणेश पाटील,कामगार वर्ग यांचेसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथा, भजन, नामस्मरण आणि भक्तिमय वातावरणामुळे परिसरात आध्यात्मिक चैतन्य निर्माण झाले आहे. कथा कालावधीत दररोज भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीमद् भागवत श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




