सज्जनांचा अपमान करू नये; अन्यथा कुळाचा नाश होतो : महंत रामगिरी महाराज
सज्जनांचा अपमान करू नये; अन्यथा कुळाचा नाश होतो : महंत रामगिरी महाराज
जाहिरात
Kopargaon vijay kapse दि १९ सप्टेंबर २०२६–
सज्जनांचा कधीही अपमान करू नये. ज्या व्यक्ती किंवा समाजाकडून सज्जनांचा अवमान होतो, त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. रावणाने बिभीषणासारख्या सज्जनाचा अपमान केला आणि त्याच्या अहंकारामुळे रावणाच्या कुळाचा नाश झाला. त्याचप्रमाणे कौरवांनी विदुरांसारख्या नीतिमान व सज्जन व्यक्तीचा अवमान केला. त्यातून महाभारताचे युद्ध घडले आणि कौरव वंशाचा विनाश झाला, असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
श्रीमद् भागवत कथा प्रवचनात ते बोलत होते. विदुर आणि मैत्रेय यांची भेट, तसेच महाभारतातील घटनांचा संदर्भ देताना त्यांनी सज्जनांचे मार्गदर्शन आणि त्यांचे महत्त्व स्पष्ट केले.जाहिरात
महंत रामगिरी महाराज म्हणाले की, युद्ध सुरू करणे सोपे असते; मात्र ते थांबविणे अत्यंत कठीण असते. आज जगातील विविध देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. युद्धामध्ये केवळ सैनिकच नव्हे, तर सामान्य नागरिक, कुटुंबे, अर्थव्यवस्था आणि संपूर्ण समाजव्यवस्था उद्ध्वस्त होते. युद्ध संपते तेव्हा अनेकदा विजय-पराजयापेक्षा दोन्ही बाजूंचे मोठे नुकसान झालेले असते.
कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध टाळण्याची संधी होती. भगवान श्रीकृष्णांनी धृतराष्ट्रासह कौरवांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र हट्ट, अहंकार आणि सत्तेच्या मोहामुळे योग्य मार्ग स्वीकारला गेला नाही. परिणामी महाभारताचे विनाशकारी युद्ध झाले. या युद्धात मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झाल्याचे महाभारतात वर्णन आढळते.जाहिरात
विदुर हे सत्य, नीती आणि विवेकाचे प्रतीक होते. त्यांनी धृतराष्ट्राला अनेकदा योग्य-अयोग्याची जाणीव करून दिली. मात्र सत्तेचा मोह आणि पुत्रमोह यामुळे धृतराष्ट्राला विदुरांचे मार्गदर्शन स्वीकारता आले नाही. त्यामुळे कुटुंबातील मतभेदाचे रूपांतर विनाशकारी संघर्षात झाले.
आजच्या काळातही या कथांमधून समाजाने बोध घेण्याची गरज आहे. सज्जनांचा सन्मान, सत्याचा स्वीकार आणि संवादातून मतभेद सोडविणे हीच शांततेची वाट आहे. अहंकार, हट्ट आणि सूडभावना यांचा मार्ग स्वीकारला तर त्याचे परिणाम व्यक्तीपासून कुटुंबापर्यंत आणि समाजापासून राष्ट्रापर्यंत घातक ठरू शकतात, असेही महंत रामगिरी महाराज यांनी सांगितले.
दरम्यान कथे प्रसंगी वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे, चंद्रपूरचे जिल्हा न्यायाधीश शिवाजीराव गुळवे, गोदावरी दुधसंघाचे अध्यक्ष राजेश परजणे,पोलिस निरीक्षक रमेश गोडगे आदींनी भेट देऊन महाराजांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी संचालक सुहास गोडगे, प्रवीण विभुते, मधुकर महाराज, रामभाऊ महाराज, चंद्रकांत महाराज, पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, गणेश पाटील, बद्रीनाथ जाधव, वसंत भाकरे, लक्ष्मण चौधरी कामगार वर्ग यांचेसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.