आपला जिल्हा

संजीवनी सैनिक स्कूलचा फुटबॉल संघ तालुक्यात अव्वल

संजीवनी सैनिक स्कूलचा फुटबॉल संघ तालुक्यात अव्वल

 

आत्मा मालिक संघावर ३-० गोलफरकाने विजय; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दिमाखदार निवड

Kopargaon vijay kapse दि २२ सप्टेंबर २०२६: शिस्त, जिद्द आणि उत्कृष्ट सांघिक खेळाच्या जोरावर संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या १९ वर्षांखालील फुटबॉल संघाने तालुकास्तरीय स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले. अंतिम सामन्यात संजीवनीच्या संघाने आत्मा मालिक संघाचा ३-० गोलफरकाने पराभव करत दिमाखदार विजेतेपद मिळविले. या शानदार कामगिरीमुळे संजीवनीच्या संघाची जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

जाहिरात

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा कार्यालय, अहिल्यानगर, तालुका क्रीडा समिती, कोपरगाव आणि संजीवनी सैनिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन संजीवनी सैनिक स्कूलच्या सुसज्ज हिरवळीच्या क्रीडांगणावर करण्यात आले होते.

जाहिरात

अंतिम सामन्यात संजीवनीच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व निर्माण केले. अचूक पासिंग, आक्रमक चाली, भक्कम बचाव आणि उत्कृष्ट सांघिक समन्वयाच्या जोरावर त्यांनी आत्मा मालिक संघावर ३-० अशी मात केली. संपूर्ण स्पर्धेत संजीवनीच्या खेळाडूंनी शिस्तबद्ध, आत्मविश्वासपूर्ण आणि दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपदावर आपले नाव कोरले.

जाहिरात

संजीवनीच्या विजयी संघात संकेत रामनाथ जगताप, आयुश सोपान जगताप, जयेश नवनीत साळुंखे, गुरू बालचंद्र डेरे, हेमांशु भाऊसाहेब सूर्यवंशी, आयुश सुनील कदम, मोहक प्रकाश देसले, शुभम नवनाथ सोनवणे, मानस मनोज पाटील, कल्पेश योगेश कडभाने, महेश प्रताप माकुणे, सुमित किशोर मुखेडकर, रूपेश गौरव अहिरे, कल्पेश देविदास पवार, साई प्रविण चौधरी, वैभव संदिप जाधव, ओम गोकुळ गदख आणि लोकेश प्रभाकर ठोंबरे यांचा समावेश होता. संघाला प्रशिक्षक पंकज सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय विजयाबद्दल संस्थेचे चेअरमन नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, प्राचार्य कैलास दरेकर, डायरेक्टर ऑफ गव्हर्नन्स डी. एन. सांगळे आणि जीएसओ सय्यद आसिफ यांनी विजयी खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा विभागाचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

जाहिरात

यावेळी बोलताना संस्थेचे विश्वस्त सुमितदादा कोल्हे म्हणाले, “संजीवनी सैनिक स्कूलमधील विद्यार्थी मेहनती आणि शिस्तप्रिय जीवनशैली अंगीकारतात. दैनंदिन जीवनात आरोग्य, तंदुरुस्ती आणि शारीरिक मेहनतीला दिले जाणारे महत्त्व विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात निश्चितच फायदेशीर ठरते. खेळातून सहकाऱ्यांसोबत यश मिळविण्याबरोबरच अपयश संयमाने स्वीकारण्याची आणि यश नम्रतेने साजरे करण्याची शिकवण मिळते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संजीवनीचे व्यवस्थापन सातत्याने प्रयत्नशील आहे.”

दरम्यान, संजीवनी सैनिक स्कूलच्या हिरवळीच्या सुसज्ज क्रीडांगणावर तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेचे करण्यात आलेले नियोजन उपस्थित खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, सामना अधिकारी आणि पंचांनी विशेष कौतुकास्पद असल्याचे सांगितले. तालुक्यात प्रथमच अशा दर्जाच्या हिरवळीच्या मैदानावर स्पर्धा झाल्याने खेळाडूंना दर्जेदार वातावरणात खेळण्याची संधी मिळाली.

 

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे