एकविराच्या ४५० युवक-युवतींनी गणेश विसर्जनात मदत करत केली निर्माल्याची साफसफाई

एकविराच्या ४५० युवक-युवतींनी गणेश विसर्जनात मदत करत केली निर्माल्याची साफसफाई
डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना मोठी मदत; प्रवरा नदीकाठी स्वच्छता अभियान
Sangmner vijay kapse दि २५ सप्टेंबर २०२६ : महाराष्ट्राचे लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणेश विसर्जनाची मिरवणूक शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या नेतृत्वाखाली एकविरा फाउंडेशनच्या सुमारे ४५० युवक-युवतींनी नागरिकांना गणेश विसर्जनासाठी मदत केली. तसेच प्रवरा नदीकाठासह विविध विसर्जनस्थळांवरील निर्माल्य संकलित करून परिसराची स्वच्छता केली.

गणेशोत्सवानिमित्त संगमनेर शहरातील मानाचे गणपती, विविध गणेश मंडळांचे तसेच घरगुती गणपतींचे सुरक्षित विसर्जन व्हावे, यासाठी एकविरा फाउंडेशन व संगमनेर नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रवरा नदीकाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गा तांबे आणि नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनीही गणेश विसर्जनात सहभाग घेतला.

डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील ४५० युवक-युवतींनी विविध विसर्जनस्थळी ५०-५० जणांच्या गटात सेवा बजावली. नागरिकांना सुरक्षित विसर्जनासाठी मार्गदर्शन करण्याबरोबरच निर्माल्य नदीत न टाकता संकलन करण्याचे आवाहन करण्यात आले. प्रवरा नदीकाठावरील गंगामाई घाट, म्हाळुंगी नदीकाठ तसेच इतर ठिकाणी युवकांनी सेवा देत निर्माल्याचे संकलन व स्वच्छता केली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने कन्व्हेअरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे नदीपात्रातील खोल पाण्यात न जाता सुरक्षितपणे गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यास नागरिकांना मदत झाली.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “यावर्षी अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे मोठे संकट निर्माण झाले असून दुष्काळी परिस्थिती आहे. अशा परिस्थितीत पाण्याची बचत महत्त्वाची आहे. शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांना मदत करावी. उर्वरित काळात महाराष्ट्रात सर्वत्र चांगला पाऊस होऊन शेतकरी व बळीराजा आनंदी होऊ दे,” अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
एकविरा फाउंडेशन मागील सात वर्षांपासून गणेश विसर्जनाच्या वेळी नागरिकांना मदत करण्याबरोबरच निर्माल्य संकलन व स्वच्छतेचे काम करत आहे. अनेक युवक स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी होतात. दुर्घटना टाळणे, नागरिकांना सुरक्षितपणे विसर्जन करता यावे आणि परिसर स्वच्छ ठेवणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
आमदार सत्यजित तांबे म्हणाले, “गणेशोत्सवाच्या बारा दिवसांत प्रत्येकाच्या घरात आनंदाचे वातावरण होते. आज गणेश विसर्जनासाठी मोठ्या संख्येने नागरिक नदीकाठी येत आहेत. या सर्वांना सेवा देण्याचे काम एकविरा फाउंडेशनचे सदस्य करत आहेत. थोरात कारखान्याने यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून मदत करून दुर्घटना टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण सहकार्य केले आहे.”
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या, “लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरणाबरोबरच विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सातत्याने सहभाग घेतला जात आहे. मागील सात वर्षांपासून गणेश विसर्जनाच्या वेळी ही सेवा दिली जात आहे. यावर्षी दुष्काळाचे सावट असल्याने सर्वत्र चांगला पाऊस पडून शेतकरी आनंदी होऊ दे, अशी प्रार्थना आहे.”
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केल्यानंतर विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात निर्माल्य निर्माण होते. त्यामुळे परिसरात अस्वच्छता वाढून रोगराईचा धोका निर्माण होऊ शकतो. हे टाळण्यासाठी एकविरा फाउंडेशनचे युवक-युवती निर्माल्य संकलन व स्वच्छतेचे काम करत असल्याने त्यातून आरोग्य आणि स्वच्छतेचा चांगला संदेश समाजात जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रवरा नदीकाठाबरोबरच जाणता राजा मैदानावर कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक नागरिकांनी या कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
विसर्जनासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची मदत
प्रवरा नदीकाठी खोल व वेगवान पाण्यामुळे दुर्घटना घडू नये आणि नागरिकांना सुरक्षितपणे गणेश विसर्जन करता यावे, यासाठी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सहकार्याने कन्व्हेअरची व्यवस्था करण्यात आली. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितपणे गणेश विसर्जन करता आले. नदीकाठी सुरक्षारक्षक, एकविराचे स्वयंसेवक, पोहणारे युवक आणि आरतीची व्यवस्था करण्यात आली होती. एकविरा फाउंडेशनच्या या उपक्रमाला संगमनेर नगरपालिकेनेही सहकार्य केले.







