एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळ्याचे आयोजन

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळ्याचे आयोजन
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळ्याचे आयोजन
Kopargaon vijay kapse दि २६ सप्टेंबर २०२६ : रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या डॉ. होमी भाभा प्रांगणात गुरुवार, दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता विशेष जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ (स्वायत्त), सातारा यांच्या कुलाधिकारी तथा खासदार सुप्रियाताई सुळे प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभाग सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा आमदार रोहित पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन तथा सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत दळवी राहणार असून, रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य तथा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. संदीप वर्पे स्वागताध्यक्ष आहेत.

बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे ऐतिहासिक कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे स्मरण तसेच त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी महाराष्ट्रभर कर्मवीर जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर कोपरगाव येथे या विशेष जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
हा कार्यक्रम श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज; कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय; डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज; पद्मा मेहता प्राथमिक विद्यामंदिर आणि कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे.

सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सुरेश बोळीज, जनरल बॉडी सदस्य अशोकराव काळे, बिपीनदादा कोल्हे, कारभारी आगवण, पद्माकांत कुदळे, बाळासाहेब कदम, अरुण चंद्रे, नानासाहेब देवकर, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्य चैतालीताई काळे, सुनील गंगुले तसेच निमंत्रित सदस्य महेंद्रकुमार काले, बाळासाहेब आव्हाड, ज्ञानेश्वर वाघचौरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या जयंती सोहळ्यास रयतप्रेमी, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, मुख्याध्यापिका अनिता धनक, प्रभारी मुख्याध्यापिका संगीता दरेकर, मुख्याध्यापक गजानन जाधव, शिवाजी लंके तसेच जयंती सोहळ्याचे समन्वयक डॉ. संतोष पवार यांनी केले आहे.



