आमदार राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या सीएनजी पंपाचा साकुरीत शुभारंभ

आमदार राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या सीएनजी पंपाचा साकुरीत शुभारंभ
आमदार राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या सीएनजी पंपाचा साकुरीत शुभारंभ

Loni vijay kapse दि २७ सप्टेंबर २०२६– सहकारी संस्थांनी पारंपरिक व्यवसायापुरते मर्यादित न राहता विविध व्यवसायांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीचे नवे मार्ग शोधण्याची गरज आहे. काळाची गरज ओळखून साकुरी येथे सुरू करण्यात आलेला सीएनजी पंप सहकारातील नव्या उपक्रमाचे एक उत्तम उदाहरण आहे. शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांसह परिसरातील वाहनधारकांना मोठा लाभ होईल, सीएनजीच्या वापरामुळे प्रदूषण कमी होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल,” असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

आमदार राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या वतीने साकुरी येथे सुरू करण्यात आलेल्या सीएनजी पंपाचा शुभारंभ मंत्री ना. विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. या प्रसंगी माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, महंत उद्धव महाराज मंडलिक, चेअरमन नंदकिशोर राठी, व्हा.चेअरमन सुनील जाधव, नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, राहात्याचे नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, व्हा.चेअरमन सोपानराव शिरसाठ, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, मुकुंदराव सदाफळ, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, भाजीपाला संस्थेचे अध्यक्ष मकरंद गुणे, उपाध्यक्ष विजयराव लगड, भारत पेट्रोलियमचे अधिकारी प्रणव अभिषेक आणि अनिश मुतानीक यांच्यासह विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना मंत्री ना. विखे पाटील म्हणाले की, वाढती वाहनसंख्या लक्षात घेता पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढणे ही काळाची गरज आहे. शासनाने सीएनजीला नेहमीच प्राधान्य दिले असून, भविष्यात सीएनजी वाहनांची संख्या वाढल्यास हवेतील प्रदूषण कमी करण्यास मोठी मदत होईल. साकुरीतील पंप शिर्डीला येणाऱ्या भाविकांसाठीही अत्यंत सोयीचा ठरणार आहे.
जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी एकत्रितपणे काम करून एकमेकांना आधार देण्याची गरज असून, सरकार जलसंवर्धनासह पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी युद्धपातळीवर नियोजन करीत आहे. सहकाराच्या माध्यमातून असे लोकाभिमुख उपक्रम उभे राहत असल्याबद्दल त्यांनी संचालक मंडळाचे कौतुक करून समाधान व्यक्त केले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी सीएनजी प्रकल्प ही काळाची गरज असल्याचे आवर्जून सांगितले. महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी प्रवरा परिसरातील सर्वच सहकारी संस्थांच्या लोकाभिमुख आणि पारदर्शक कारभाराचे तोंडभरून कौतुक केले.
या वेळी भारत पेट्रोलियमचे अधिकारी प्रणव अभिषेक यांनी सीएनजीच्या वापराबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात उपाध्यक्ष सुनील जाधव यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची व नव्याने सुरू झालेल्या पंपावरील अद्ययावत सुविधांची माहिती दिली.



