आपला जिल्हा

प्रारंभ-२०२६मधून एम.बी.ए. विद्यार्थ्यांना उद्योग, नेतृत्व व व्यवस्थापनाची नवी दिशा; अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या १२० विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

प्रारंभ-२०२६मधून एम.बी.ए. विद्यार्थ्यांना उद्योग, नेतृत्व व व्यवस्थापनाची नवी दिशा; अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या १२० विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

प्रारंभ-२०२६मधून एम.बी.ए. विद्यार्थ्यांना उद्योग, नेतृत्व व व्यवस्थापनाची नवी दिशा; अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या १२० विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

Sangmner vijay kapse दि २८ सप्टेंबर २०२६ : अमृतवाहिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (स्वायत्त) येथील एम.बी.ए. विभागातर्फे प्रथम वर्षाच्या १२० विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘प्रारंभ-२०२६’ हा स्वागत व मार्गदर्शन उपक्रम विविध शैक्षणिक, औद्योगिक, उद्योजकीय आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. १० ते १९ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांना एम.बी.ए. शिक्षणासोबत उद्योगविश्व, नेतृत्व, उद्योजकता, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्यवस्थापन कौशल्यांची प्रत्यक्ष ओळख करून देण्यात आली.

जाहिरात

‘एम.बी.ए. केवळ पदवी नव्हे, तर उज्ज्वल भविष्यासाठीची सक्षम वाटचाल’ ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून ‘प्रारंभ-२०२६’चे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतप्रसंगी प्राचार्य डॉ. बाविस्कर यांनी, “प्रारंभ-२०२६ हा केवळ एम.बी.ए. प्रवासाचा प्रारंभ नसून ज्ञान, कौशल्य, नेतृत्वगुण आणि व्यक्तिमत्त्व विकासाची नवी सुरुवात आहे. बदलत्या जगातील संधी ओळखा, सतत शिकत राहा आणि आत्मविश्वासाने पुढे चला,” असे आवाहन केले. विभागप्रमुख डॉ. वृषाली साबळे यांनी कार्यक्रमाची संकल्पना व रूपरेषा स्पष्ट केली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांसाठी परिचय सत्र, संवादात्मक उपक्रम आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध गतिविधी घेण्यात आल्या. कौशल्य विकास मार्गदर्शिका कोमल बंडगर यांनी ‘एम.बी.ए. ते कॉर्पोरेट विश्वापर्यंतची वाटचाल’ या विषयावर मार्गदर्शन केले. संवादकौशल्य, व्यावसायिक दृष्टिकोन आणि वर्गातील ज्ञानाचे कॉर्पोरेट कौशल्यांमध्ये रूपांतर याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

जाहिरात

मानसशास्त्र प्रशिक्षक विलास दिघे यांनी ‘आत्मविकासाची कला’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आत्मविश्वास, सकारात्मक विचारसरणी, व्यक्तिमत्त्व विकास आणि ध्येयपूर्ती यावर आधारित हे सत्र विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले. डॉ. विलास शिंदे यांनी औद्योगिक ऑटोमेशनमधील भविष्यातील संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
इंटेलिजन्ट डिक्स, पुणेचे सहसंस्थापक डॉ. अजय शुक्ला यांनी ‘व्यवसायाभिमुख विचारसरणी’ या विषयावर मार्गदर्शन केले. नेतृत्वदृष्टी, नवोन्मेषी विचारसरणी आणि बदलत्या व्यावसायिक वातावरणात आवश्यक असलेल्या कौशल्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. डॉ. दीपक बजाज यांनी महाविद्यालयातील उद्योजकता केंद्रामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम व विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या संधींची माहिती दिली.

जाहिरात

उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी साई प्लास्टो उद्योगसमूहाच्या सहसंस्थापिका कोमल उगले, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व रेशीमवाला उद्योगाचे संस्थापक रामेश्वर पानसरे तसेच सुप्रभा पॉलीमर्सचे सीईओ रणजित वर्पे यांच्या सहभागातून विशेष उद्योजकीय चर्चासत्र घेण्यात आले. व्यवसायाची सुरुवात, अडचणींवर मात, जोखीम स्वीकारणे, संधी ओळखणे, नवकल्पना आणि व्यवसाय विस्ताराचा प्रवास याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांशी अनुभवाधारित संवाद साधला.
‘कृषी पर्यटन आणि व्यवस्थापन’ या संकल्पनेवर आधारित आउटबाउंड उपक्रम व अभ्यासदौराही आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी कृषी पर्यटनस्थळांना भेट देऊन कृषी, पर्यटन आणि व्यवस्थापन यांचा परस्परसंबंध प्रत्यक्ष अनुभवला. विविध खेळ व टीम-बिल्डिंग उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, नेतृत्व, निर्णयक्षमता, समन्वय, संवादकौशल्य आणि स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्यावर भर देण्यात आला.
समारोपाच्या दिवशी भारतातील नामांकित एच.आर. मार्गदर्शक व TEDx वक्ते साहिल नायर यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता, क्षमता आणि नेतृत्व’ या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, बदलत्या व्यवसायविश्वाशी जुळवून घेण्याची क्षमता, नेतृत्वकौशल्ये आणि भविष्यातील व्यवस्थापकांची भूमिका याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ. शरयू देशमुख यांच्याशी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला.
संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, कार्यकारी विश्वस्त सौ. शरयू देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्राचार्य डॉ. बाविस्कर आणि रजिस्ट्रार प्रा. वाघे यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एम.बी.ए. विभागप्रमुख डॉ. वृषाली साबळे, सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

‘प्रारंभ-२०२६’ हा केवळ एम.बी.ए. अभ्यासक्रमाची सुरुवात न ठरता ‘ज्ञान, नातेसंबंध आणि प्रगती’ या त्रिसूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यवस्थापन, नेतृत्व आणि व्यावसायिक वाटचालीला नवी दिशा देणारा उपक्रम ठरला.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे