आपला जिल्हा

रोजगारासाठी कौशल्यांसोबत जिद्द आणि आत्मविश्वास गरजेचा-  माजी आमदार कोल्हे

रोजगारासाठी कौशल्यांसोबत जिद्द आणि आत्मविश्वास गरजेचा-  माजी आमदार कोल्हे

 

संजीवनी पॉलिटेक्निकमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ

Kopargaon vijay kapse दि ३० सप्टेंबर २०२६ : विकसित देशांमध्ये रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ घेण्यासाठी युवक-युवतींनी शिक्षणासोबत उद्योगविश्वाला आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करावीत. मात्र कौशल्यांसोबतच जिद्द, आत्मविश्वास आणि परिस्थितीशी दोन हात करण्याची तयारीही आवश्यक आहे, असे प्रतिपादन माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केले.

जाहिरात

संजीवनी के. बी. पी. पॉलिटेक्निकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शासनाच्या ‘सेवासंकल्प’ अभियानांतर्गत महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभा’चे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

जाहिरात

यावेळी कोपरगावच्या नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, प्राचार्य ए. आर. मिरीकर, हेड ऑफ अकॅडमिक गव्हर्नन्स डॉ. आर. एस. शेंडगे, महाकुंभाचे समन्वयक अमोल घोलप, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच रोजगाराच्या संधीसाठी आलेले युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापूर्वी मुंबई येथील एसएनडीटी महिला विद्यापीठात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या ‘पंडित दीनदयाल उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ या राज्यस्तरीय उपक्रमाच्या उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण उपस्थितांना दाखविण्यात आले.

यावेळी सौ. कोल्हे म्हणाल्या, “दिवसेंदिवस रोजगाराचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे रोजगार महाकुंभासारखे उपक्रम ही काळाची गरज आहे. ‘सेवासंकल्प’ अभियानाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी युवकांपर्यंत पोहोचत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. रोजगार महाकुंभ हा केवळ नोकरी देण्याचा उपक्रम नसून युवकांच्या कौशल्यांना योग्य संधीशी जोडण्याचा प्रयत्न आहे.”

संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकमध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मा. आमदार स्नेहलता कोल्हे.

युवतींना आवाहन करताना त्या म्हणाल्या, “परिस्थितीसमोर हताश होऊ नका. रडत बसण्यापेक्षा परिस्थितीशी लढत राहा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेवा.” ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना योग्य कौशल्य, संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते देश-विदेशात आपले स्थान निर्माण करू शकतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जागतिक पातळीवर आपले अस्तित्व निर्माण करावे, या उद्देशाने माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संजीवनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीने उभारलेल्या या संस्थेतील अनेक विद्यार्थी आज देश-विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. संजीवनीचे अनेक विद्यार्थी रशिया, जपानसह विविध देशांमध्ये कार्यरत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराची सांगड घातल्यास युवकांच्या सामर्थ्याला योग्य दिशा मिळेल आणि विकसित भारताचे स्वप्न साकारण्यास मोठी मदत होईल, असे सौ. कोल्हे यांनी शेवटी नमूद केले. दरम्यान, कोपरगाव येथील या रोजगार महाकुंभात विविध क्षेत्रातील १५ कंपन्यांनी सहभाग घेतला, तर सुमारे ५०० युवक-युवतींनी नावनोंदणी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आय. के. सय्यद यांनी केले, तर आभार प्राचार्य ए. आर. मिरीकर यांनी मानले.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे