नवीन लोकप्रतिनिधीचे भोजापूर चारीसाठी योगदान काय?-सचिन दिघे

नवीन लोकप्रतिनिधीचे भोजापूर चारीसाठी योगदान काय?-सचिन दिघे
नदीजोड प्रकल्पाच्या नावाखाली तालुक्याचे पाणी पळविले जात असताना त्यावर बोला; सचिन दिघे यांचा सवाल
Sangmner vijay kapse दि १६ ऑक्टोबर २०२६ : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून भोजापूर चारीचे काम पूर्ण झाले आहे. मागील वर्षी तसेच यावर्षी सुरुवातीला झालेल्या चांगल्या पावसामुळे या चारीत पाणी आले. चारी तयार करून ठेवली होती म्हणूनच पाणी आले. त्यामुळे या चारीसाठी नवीन लोकप्रतिनिधीचे योगदान काय? असा सवाल तळेगाव दिघे येथील युवक कार्यकर्ते सचिन दिघे यांनी केला आहे. तालुक्याचे पाणी दुसरीकडे पळविले जात असताना नवीन लोकप्रतिनिधी त्यावर एक शब्दही बोलत नाहीत आणि भोजापूर व नदीजोड प्रकल्पाची मात्र टिमकी वाजविली जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

सचिन दिघे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे की, तळेगाव विभागासह दुष्काळी भागासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाठपुरावा केला. तसेच भोजापूर धरणातून चारीच्या माध्यमातून निमोण व परिसराला पाणी मिळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न केले. ही भोजापूर चारी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून तयार झाली आहे.

ज्या-ज्या वेळी चांगला पाऊस झाला, त्या-त्या वेळी नान्नज दुमाला, तळेगाव व परिसरातील नागरिकांना या चारीच्या माध्यमातून पाणी मिळाले आहे. यावर्षीही सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने चारीमध्ये पाणी आले. त्यामुळे चारी अस्तित्वात होती म्हणूनच पाणी मिळाले; नवीन लोकप्रतिनिधींनी यासाठी नेमके काय केले? असा प्रश्न दिघे यांनी उपस्थित केला.
‘दोन वर्षांत तालुक्यात एकही नवीन काम नाही’
मागील दोन वर्षांत तालुक्यात एकही नवीन काम झालेले नाही. तळेगाव विभागातही एकही नवीन काम झालेले नाही. केवळ फ्लेक्सबाजी एवढेच काम सुरू असल्याची टीका सचिन दिघे यांनी केली. आजही सर्वसामान्य जनता आपली कामे घेऊन यशोधन कार्यालयातच जात आहे. आमदार सत्यजित तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पाठपुराव्यातून सर्वसामान्य जनतेची शासकीय कामे तत्परतेने मार्गी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवीन लोकप्रतिनिधींना अद्याप ठोस कोणतेही काम करता आलेले नाही. शासनाकडे निधी नाही, त्यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत. साध्या संजय गांधी निराधार योजनेचेही देणे थकले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्यासह चारा व इतर अनेक प्रश्न गंभीर झाले आहेत. अशा परिस्थितीत नवीन लोकप्रतिनिधींनी मूलभूत प्रश्नांवर आवाज उठविणे गरजेचे असल्याचे दिघे यांनी म्हटले.
‘नदीजोड प्रकल्पाची टिमकी वाजविण्यापेक्षा तालुक्याच्या पाण्यावर बोला’
नदीजोड प्रकल्पाबाबत बोलण्यापेक्षा तालुक्याचे पाणी दुसरीकडे जात असताना त्यावर बोला. दुष्काळी परिस्थितीवर बोला, शेतकऱ्यांना पीक विमा का मिळाला नाही यावर बोला, तालुक्याची रेल्वे पळविली गेली त्यावर बोला, अशी मागणीही सचिन दिघे यांनी केली. या मूलभूत प्रश्नांवर एक शब्दही न बोलता जनतेसमोर केवळ भुलभुलैया निर्माण केली जात असल्याची टीका त्यांनी केली.
‘तळेगावचा परिसर बाळासाहेब थोरातांच्या पाठीशीच’
तळेगावमधून शिवसेनेमध्ये नव्याने कोणाचाही प्रवेश झालेला नाही. जे पूर्वी होते, तेच लोक पुन्हा अंगावर झूल टाकून मिरवत असल्याचा टोला सचिन दिघे यांनी लगावला. तळेगाव परिसर हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठीशी पूर्वीही होता आणि भविष्यातही राहील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.




