वारीतील राहुलदादा मित्र मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम;
नवरात्रोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत विद्यालयाला दिली मदत
वारीतील राहुलदादा मित्र मंडळाचा प्रेरणादायी उपक्रम;
नवरात्रोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत विद्यालयाला दिली मदत
Kopargaon vijay kapse दि १७ ऑक्टोबर २०२६ : नवरात्रोत्सवातील अनावश्यक खर्च टाळून सामाजिक आणि शैक्षणिक कार्याला हातभार लावण्याचा आदर्श राहुल (दादा) मित्र मंडळाच्या महिला सदस्यांनी घालून दिला आहे. बँड, डीजे आणि फटाक्यांच्या आतषबाजीवरील खर्च टाळून मंडळाने गावातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री रामेश्वर विद्यालयाला विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी 30 हजार रुपये किमतीचे पाच ब्रास पेव्हर ब्लॉक देण्याची घोषणा मंडळाचे मार्गदर्शक पत्रकार रोहित टेके यांनी केली आहे.जाहिरात
मंडळाच्या महिला सदस्य गेल्या तीन वर्षांपासून नवरात्रोत्सवानिमित्त ज्योत पदयात्रेचे आयोजन करतात. पहिल्या वर्षी उक्कडगाव येथील रेणुका माता मंदिरातून, दुसऱ्या वर्षी कोपरगाव बेट येथील जुनी गंगा देवी मंदिरातून, तर यंदा श्रीक्षेत्र लासूर (ता. वैजापूर) येथून एका दिवसात धावत ज्योत आणण्यात आली. विशेष म्हणजे, या उपक्रमासाठी महिला सदस्य स्वतः वर्गणी गोळा करतात.जाहिरात
विद्यालयात मध्यान्ह भोजनाच्या वेळी विद्यार्थ्यांना बसण्यासाठी सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी लोकसहभागातून एकूण ६० ब्रास पेव्हर ब्लॉक बसविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य आणि मंडळाचे मार्गदर्शक पत्रकार रोहित टेके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी मंडळाने पाच ब्रास ब्लॉकची मदत जाहीर केली. यावेळी विद्यालयाच्यावतीने मंडळातील सर्व महिलांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.जाहिरात
याबरोबरच मंडळाच्या माध्यमातून उन्हाळ्यात पाणपोई, धार्मिक दिंड्यांना अन्नदान, रोकडोबाबा यात्रा उत्सव आणि शैक्षणिक कार्यासाठी मदत असे सामाजिक उपक्रमही राबविले जातात.
उत्सवातील दिखाव्यापेक्षा समाजोपयोगी कार्याला प्राधान्य देण्याचा संदेश मंडळाने या उपक्रमातून दिला आहे. इतर मंडळांनीही अनावश्यक खर्च टाळून गावातील शाळांच्या विकासासाठी पुढाकार घेतल्यास ग्रामीण शिक्षणाला मोठे बळ मिळू शकते. उत्सवाचा आनंद काही दिवसांचा असतो. मात्र शिक्षणासाठी केलेली मदत अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारी असते अशी भावना रोहित टेके यांनी याप्रसंगी व्यक्त केली आहे.
याप्रसंगी मुख्याध्यापक शरीफ शेख, शिक्षक कैलास शेळके, वसंत जाधव, रवींद्र रासकर, सिताराम झुराळे, तुकाराम जेठे, उत्तमराव वाकचौरे, योगिता कर्डेल, शालिनी कर्पे, अनीसा पठाण या शिक्षकांसह राहुल (दादा) मित्र मंडळाच्या सर्व महिला सदस्य उपस्थित होत्या.