जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत अमृतवाहिनी मॉडेल स्कूलची दमदार कामगिरी

जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत अमृतवाहिनी मॉडेल स्कूलची दमदार कामगिरी
मुलींचा संघ द्वितीय, तर मुलांचा संघ तृतीय क्रमांकावर
Sangmner vijay kapse दि १७ ऑक्टोबर २०२६–जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेत अमृतवाहिनी मॉडेल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अमृतनगर, संगमनेर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा कायम राखली आहे. या स्पर्धेत शाळेच्या १७ वर्षांखालील (U-17) मुलींच्या संघाने द्वितीय, तर मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला. दोन्ही संघांच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

स्पर्धेदरम्यान दोन्ही संघांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली. खेळाडूंची मेहनत, शिस्त, सांघिक भावना आणि जिंकण्याची जिद्द या यशातून अधोरेखित झाली. मैदानावर दाखवलेले कौशल्य आणि आत्मविश्वास यामुळे अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या क्रीडा गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली.

मुलींच्या संघाचे नेतृत्व कर्णधार कु. जोशना भोये हिने, तर मुलांच्या संघाचे नेतृत्व कर्णधार साई बोडके याने केले. दोन्ही संघांना क्रीडा शिक्षक व मार्गदर्शक रविंद्र कदम, जयराज दुशिंग, रोहित गाडे आणि वृशाली भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि सांघिक समन्वयाच्या बळावर हे यश संपादन केले.

या यशाबद्दल अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, संस्थेच्या व्यवस्थापकीय विश्वस्त शरयू देशमुख, विश्वस्त अनिल शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी बी. बी. धुमाळ आणि शाळेचे प्राचार्य आशिष कुमार यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
यावेळी सर्व विभागप्रमुख आणि शिक्षकांनीही यशस्वी खेळाडूंचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचे आणि संगमनेरचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



