एस.एस.जी.एम. महाविद्यालयातर्फे ‘स्कूल कनेक्ट 3.0’ संपर्क अभियान

एस.एस.जी.एम. महाविद्यालयातर्फे ‘स्कूल कनेक्ट 3.0’ संपर्क अभियान
कोपरगाव शहर व परिसरातील १२ कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी; राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
Kopargaon vijay kapse दि १७ ऑक्टोबर २०२६ : रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालय, कोपरगाव यांच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या विविध संधींची माहिती करून देण्यासाठी ‘स्कूल कनेक्ट 3.0’ संपर्क अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत कोपरगाव शहर व परिसरातील १२ कनिष्ठ महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, उच्च शिक्षणातील बदल आणि भविष्यातील करिअरच्या संधींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

‘तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य’ यांच्या शासन परिपत्रकानुसार तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२ ऑगस्ट २०१९ रोजीच्या संदर्भपत्राच्या अनुषंगाने या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

अभियानादरम्यान विद्यार्थ्यांना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शैक्षणिक संरचना, अभ्यासक्रमाची रचना, क्रेडिट पद्धती, विविध विद्याशाखांतील विषयांचे महत्त्व आणि करिअरच्या उपलब्ध संधी यांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच ए.बी.सी. आयडी, अपार आयडी, डिजिलॉकर आणि नवीन परीक्षा पद्धती यांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.

बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे, अभ्यासक्रम निवडीसाठी योग्य दिशा देणे आणि उच्च शिक्षणातील विविध पर्यायांची ओळख करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. यावेळी प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, कौशल्यविकास आणि भविष्यातील रोजगाराच्या संधी यांविषयी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या बदलत्या स्वरूपाची माहिती मिळण्यास तसेच भविष्यातील शैक्षणिक नियोजनासाठी दिशा मिळण्यास मदत झाली.
या संपर्क अभियानासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे समन्वयक डॉ. अर्जुन भागवत, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे डॉ. निलेश मालपुरे तसेच कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सक्रिय योगदान दिले.



