तरुणाईच्या विचारांतूनच घडेल सक्षम भारत, सामाजिक बांधिलकीतून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या – बाळासाहेब थोरात

तरुणाईच्या विचारांतूनच घडेल सक्षम भारत, सामाजिक बांधिलकीतून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या – बाळासाहेब थोरात

Pune vijay kapse दि १७ ऑक्टोबर २०२६ : पुणे येथील व्हीआयटीच्या सोशल वेल्फेअर अँड डेव्हलपमेंट कमिटीच्या वतीने आयोजित ‘PRISM 2026’ या उपक्रमाला माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत जीवनप्रवास, ग्रामीण विकास, शिक्षण, युवा नेतृत्व, पर्यावरण, शाश्वत विकास आणि समाजपरिवर्तन अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तरुणाई ही देशाची खरी ताकद असून, तरुणांच्या विचारांतून समाजाला नवी दिशा आणि त्यांच्या कृतीतून परिवर्तन घडते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

आजच्या तरुणांनी समाजातील प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ बदलाची अपेक्षा न करता स्वतः बदलाचा भाग बनणे आणि स्वतःला शिस्त लावून तिचे पालन करणे, हीदेखील राष्ट्रसेवेची महत्त्वाची पायरी आहे. विद्यार्थिदशेत केवळ शिक्षण घेणे पुरेसे नसून, समाजातील घडामोडींचे भान ठेवणे आणि सामाजिक प्रश्नांप्रती आपली जबाबदारी ओळखणे तितकेच आवश्यक आहे. विद्यार्थी चळवळींमधून नेतृत्व घडते आणि समाजाप्रती जाणीव असलेली नवी पिढी तयार होते, असे थोरात यांनी सांगितले.

ग्रामीण विकासाच्या संदर्भात बोलताना थोरात यांनी २००९ मध्ये राज्यात एक लाख शेततळी निर्माण करण्याचा घेतलेला निर्णय आणि आपल्या मंत्रीपदाच्या काळातील विविध महत्त्वपूर्ण निर्णयांचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. जलसंधारणाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देता येते, यावर त्यांनी भर दिला. तसेच, वसंतदादा पाटील यांच्या काळात विनाअनुदानित महाविद्यालयांच्या माध्यमातून उच्च शिक्षणाच्या संधी वाढवण्याच्या प्रक्रियेला मिळालेली चालना आणि त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची खुली झालेली दारे, यांचाही त्यांनी उल्लेख केला.
देशाचे भविष्य घडवताना तरुणांनी स्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारला पाहिजे—आपल्याला देश कसा घडवायचा आहे? जाती-धर्माच्या भिंतींमध्ये अडकलेला देश की समता, बंधुता, विज्ञाननिष्ठ विचार आणि प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करणारा सक्षम भारत? आजच्या तरुणांच्या विचारांतून आणि कृतीतूनच या प्रश्नाचे उत्तर आकाराला येणार आहे. त्यामुळे तरुणांनी व्यापक दृष्टिकोन ठेवून शिक्षणाला सामाजिक बांधिलकीची जोड द्यावी आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन थोरात यांनी केले.
‘PRISM 2026’ सारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, नव्या विचारांना आणि सामाजिक जाणिवांना व्यासपीठ उपलब्ध करून देतात. विद्यार्थ्यांना योग्य संधी, मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास त्यांच्यातून समाजात मोठे परिवर्तन घडू शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल आयोजक, प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांचे थोरात यांनी आभार मानले तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.



