आपला जिल्हा

राष्ट्रीय एकता दिनाच्या ‘एकता परेड’मध्ये संजीवनी सैनिकी स्कूलचे ब्रास बँड पथक वादन करणार

राष्ट्रीय एकता दिनाच्या ‘एकता परेड’मध्ये संजीवनी सैनिकी स्कूलचे ब्रास बँड पथक वादन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सादरीकरणाची संधी; विजयादशमीच्या मुहूर्तावर पथक रवाना

Kopargaon vijay kapse दि २२ ऑक्टोबर २०२६ : नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत ब्रास बँड गटात देशात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या बँड पथकाला आता गुजरातमधील एकतानगर येथे ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय एकता दिनाच्या ‘एकता परेड-२०२६’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या राष्ट्रीय सोहळ्यात संजीवनीचे विद्यार्थी आपल्या वादन कौशल्याचे सादरीकरण करणार आहेत. या अभिमानास्पद कामगिरीच्या पार्श्वभूमीवर विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर शाळेच्या परिसरात लष्कराकडून प्राप्त रणगाडा व अन्य शस्त्रांचे, तसेच ब्रास बँडच्या वाद्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन पथकाला रवाना करण्यात आले.

जाहिरात

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने ९ सप्टेंबर २०२६ रोजी पाठविलेल्या अधिकृत पत्रानुसार, संजीवनीच्या बँड पथकाची ‘स्कूल बँड डिस्प्ले’मधील ‘बॉईज ब्रास बँड’ या श्रेणीसाठी निवड झाली आहे. २१ ऑक्टोबरपासून एकतानगर येथे देशभरातील सहभागी शालेय बँड पथकांसोबत संयुक्त सराव सुरू होणार असून, ३१ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय एकता दिनाच्या मुख्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

जाहिरात

राष्ट्रीय स्पर्धेतील विजेतेपदापासून थेट राष्ट्रीय एकता दिनाच्या सोहळ्यापर्यंतचा हा प्रवास विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांची, जिद्दीची आणि संजीवनीतील शिस्तबद्ध प्रशिक्षणाची साक्ष देणारा आहे. या यशासाठी विद्यार्थ्यांनी अनेक दिवस सातत्याने सराव करून वादनातील अचूकता, ताल-लय, संचलनातील शिस्त, शारीरिक तंदुरुस्ती आणि सांघिक समन्वय यांवर विशेष मेहनत घेतली. या यशात बँड प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, संगीत शिक्षक महेश गुरव यांचे योगदान, प्राचार्य कैलास दरेकर यांचे नियोजन, कल्चरल हेड शुभम जाधव यांचे सहकार्य, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिश्रम महत्त्वाचे ठरले आहेत.

जाहिरात

संस्थेचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे आणि मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या यशाचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच विजयादशमीच्या निमित्ताने आयोजित छोटेखानी कार्यक्रमात संस्थेचे विश्वस्त सुमित कोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय सोहळ्यात उत्कृष्ट सादरीकरणासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

संजीवनी शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसोबतच संगीत, क्रीडा, नेतृत्व, शिस्त आणि देशभक्तीच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकासाच्या विविध संधी उपलब्ध करून दिल्या जातात. शेतकरी आणि कष्टकरी कुटुंबांतील विद्यार्थ्यांमध्येही जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर राष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करण्याची क्षमता असते, हे संजीवनीच्या बँड पथकाने सिद्ध केले आहे.

दिल्लीतील राष्ट्रीय विजेतेपदानंतर आता एकतानगर येथे देशाच्या एकात्मतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रीय सोहळ्यात सादरीकरण करण्याची संधी मिळाल्याने कोपरगावच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे