जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत आर्यवीर कराटे क्लासचे नऊ खेळाडू प्रथम क्रमांकाने चमकले

जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत आर्यवीर कराटे क्लासचे नऊ खेळाडू प्रथम क्रमांकाने चमकले
पुणे येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड; कोपरगावच्या खेळाडूंची उल्लेखनीय कामगिरी
Kopargaon vijay kapse दि २२ ऑक्टोबर २०२६: राहता तालुक्यातील नांदूरखी येथील तालुका क्रीडा संकुलात दिनांक १६ व १७ ऑक्टोबर २०२६ रोजी शालेय शासकीय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून सुमारे ४५० ते ५०० मुला-मुलींनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत कोपरगाव तालुक्यातील आर्यवीर कराटे क्लासच्या नऊ खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. या सर्व खेळाडूंची पुणे येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या स्पर्धेत संजीवनी सैनिकी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे समर्थ बच्छाव आणि वैभव गोटे यांनी १९ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक मिळविला. श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथील हर्ष लंगोटे आणि स्वराली कटारे यांनी १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला.

कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्यालयाची विद्यार्थिनी अर्पिता आहेर हिने १७ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. के. जे. सोमय्या कॉलेज, कोपरगाव येथील बारावीच्या विद्यार्थिनी सप्तमी डहारे आणि समीक्षा जाधव यांनी १९ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक मिळविला.

श्रीमान गोकुळचंद विद्यालय, कोपरगाव येथील वर्धा पवार हिने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात, तर महर्षी विद्यालय, कोपरगाव येथील आदित्य सांगळे याने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात प्रथम क्रमांक पटकाविला. या सर्व यशस्वी खेळाडूंना कराटे संघटनेचे प्रमुख प्रा. सुदर्शन पांढरे सर आणि ॲड. स्नेहल पांढरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेच्या प्रमुख महिला प्रशिक्षिका वर्षा देठे मॅडम, आशुतोष भोसले सर, पुष्कर बागडे सर, सरस ठोळे सर आणि यश सांगळे सर यांनीही खेळाडूंना मार्गदर्शन केले.
जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व नऊ खेळाडूंचे अभिनंदन होत असून, पुणे येथे होणाऱ्या विभागीय कराटे स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.



