कोपरगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ४८ तासांत भांडी चोरीचा गुन्हा उघडकीस

कोपरगाव पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; ४८ तासांत भांडी चोरीचा गुन्हा उघडकीस
चोरीस गेलेला ५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; आरोपीचा शोध सुरू
Kopargaon vijay kapse दि २२ ऑक्टोबर २०२६ : कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडी व भांडी चोरीचा गुन्हा अवघ्या ४८ तासांत उघडकीस आणत चोरीस गेलेला सुमारे ५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या संशयिताची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे रेणुका माता मंदिराजवळ राहणारे ऊसतोडणी कामगार महेंद्र रमेश निकम (वय ३९, रा. रुणकमानता, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) हे १८ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी सहा वाजता ऊसतोडणीसाठी गेले होते. सायंकाळी पाच वाजता ते घरी परतले असता त्यांच्या घरातील संसारोपयोगी भांडी चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. यात पातेली, कढई, दोन कुकर, परात, तवा, ताट, तांबे व ग्लास अशा एकूण ५ हजार ५०० रुपये किमतीच्या वस्तूंचा समावेश होता.

याप्रकरणी महेंद्र निकम यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०५(अ) प्रमाणे १९ ऑक्टोबर रोजी रात्री १०.०४ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला गती
गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस पथकाने संशयित किशोर भाऊसाहेब पवार (वय ३१, व्यवसाय मजुरी, रा. ब्राह्मणगाव, ता. कोपरगाव) याच्याबाबत तपास केला. चौकशीत चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चोरीस गेलेली भांडी हस्तगत केली.
या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी गुन्ह्यातील दुसरा संशयित सुभाष छगन मोरे याचा शोध सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या सूचनेनुसार पोलीस अंमलदार रशीद शेख, रमेश झाडे, सागर शेवाळे आणि महिला पोलीस अंमलदार फिजा पठाण यांनी सहभाग घेतला.
कोपरगाव तालुका पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आला असून, परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.



