जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेवर आत्मा मालिक गुरुकुलचे वर्चस्व; ३२ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेवर आत्मा मालिक गुरुकुलचे वर्चस्व; ३२ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेवर आत्मा मालिक गुरुकुलचे वर्चस्व; ३२ खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
Kopargaon vijay kapse दि २३ ऑक्टोबर २०२६: जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत कोकमठाण येथील आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करीत आपले वर्चस्व सिद्ध केले. विविध मैदानी क्रीडा प्रकारांत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावत गुरुकुलच्या खेळाडूंनी आपल्या क्रीडानैपुण्याची छाप पाडली. या स्पर्धेत गुरुकुलच्या २४ मुले व ८ मुली अशा एकूण ३२ खेळाडूंची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने लोणी येथील विखे पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये १९ वर्षांखालील मुलांच्या गटात सचिन वराठा, विपुल वळवी, रोहन कोंब, विवेक चौधरी व यशराज चव्हाण यांनी ४×१०० मीटर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. याच गटात सचिन वराठा, रोहन कोंब, आकाश ठाकरे, प्रवीण धनगर व प्रतीक ठींगळे यांनी ४×४०० मीटर रिले स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. रोहन कोंब याने लांब उडीमध्ये द्वितीय, तर प्रतीक ठींगळे याने ४०० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळविला.

१७ वर्षांखालील गटात प्रफुल्ल वसावे याने १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. चेतन तलवारे याने ३००० मीटर धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. किशोर पावरा याने उंच उडीमध्ये प्रथम, तर ११० मीटर हर्डल्समध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. बांबू उडी या क्रीडा प्रकारात रोहन पावरा व नैतिक चौधरी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तर राजवीर पावरा, दिलबरसिंग व गौरव गावित यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. मुलींच्या गटातही आत्मा मालिक गुरुकुलच्या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. १९ वर्षांखालील गटात उर्मिला महाले हिने १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय, तसेच क्रॉस कंट्री स्पर्धेत चौथा क्रमांक मिळविला. अश्विनी भोये हिने द्वितीय, तर प्रीती चौधरी हिने तृतीय क्रमांक पटकावला.
१७ वर्षांखालील गटात भावना भोये हिने बांबू उडीमध्ये प्रथम, तर प्रीती खर्डे हिने द्वितीय क्रमांक मिळविला. १९ वर्षांखालील गटात पूजा ईभाड (पूजा सुभाष) हिने बांबू उडीमध्ये प्रथम, तर पूनम पटले हिने द्वितीय क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील गटात आराध्या गुडघे हिने ८० मीटर हर्डल्स स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.

या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अजित पवार यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सद्गुरू आत्मा मालिक माऊली यांच्या आशीर्वादाने संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, शैक्षणिक व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वरपे, श्रीमती मीरा पटेल, तसेच गुरुकुलचे प्राचार्य माणिक जाधव, मीना काकडे व नितीन सोनवणे यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हास्तरीय स्पर्धेत मिळविलेल्या या यशामुळे आत्मा मालिक गुरुकुलच्या क्रीडा क्षेत्रातील भक्कम वाटचालीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.



