ऑल इंडिया विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी आत्मा मालिकचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. राहुल पादमोर याची निवड

ऑल इंडिया विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी आत्मा मालिकचा महाराष्ट्र चॅम्पियन पै. राहुल पादमोर याची निवड
आंतरविभागीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक; आत्मा मालिक कुस्ती केंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा
Kopargaon vijay kapse दि २२ ऑक्टोबर २०२६ : आंतरविभागीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा पैलवान पै. राहुल पादमोर याने फ्रीस्टाइल प्रकारात सुवर्णपदक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या शानदार कामगिरीच्या जोरावर त्याची अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या यशामुळे आत्मा मालिक कुस्ती केंद्रात आनंदाचे वातावरण असून, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी व विश्वस्त मंडळाने त्याचे अभिनंदन केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या वतीने धुळे येथे आंतरविभागीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राहुल पादमोर याने सुरुवातीच्या लढतींपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. आक्रमक आणि उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करत त्याने प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली.

आता राहुल पादमोर अखिल भारतीय विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे मुख्य प्रशिक्षक भरत नायकल यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.
राहुलच्या यशाबद्दल बोलताना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हणाले की, पैलवान राहुल पादमोर याने आपल्या कामगिरीतून आत्मा मालिक कुस्ती केंद्राचा नावलौकिक वाढविला आहे. या केंद्रात आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण दिले जाते. केंद्राला साईची मान्यता प्राप्त असून, येथील पैलवान विविध कुस्ती स्पर्धांमध्ये सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.

या कुस्ती केंद्राला आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक भरत नायकल व पै. विवेक नायकल, तसेच एनआयएस कुस्ती प्रशिक्षक पै. अशोक पाटील आणि पै. अक्षय डांगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दर्जेदार कुस्तीपटू घडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
ऑलिम्पिक पदकासाठी कुस्तीपटू घडविण्याचे ध्येय
ऑलिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्याच्या दृष्टीने कुस्ती या खेळाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्ल घडविण्यासाठी आत्मा मालिक कुस्ती केंद्रात विशेष प्रयत्न केले जातात. पैलवान राहुल पादमोर याने मिळविलेल्या सुवर्णपदकामुळे केंद्रातील प्रशिक्षकांचा उत्साह आणखी वाढणार असून, आगामी स्पर्धांमध्येही तो उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास आहे. नंदकुमार सूर्यवंशी, अध्यक्ष, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट



