आजपासून एकाच छताखाली मिळणार दिवाळीचे सर्व साहित्य

आजपासून एकाच छताखाली मिळणार दिवाळीचे सर्व साहित्य
महिला बचत गटांना मिळणार हक्काचे व्यासपीठ- पुष्पा काळे : नागरिकांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा
Kopargaon vijay kapse दि २४ ऑक्टोबर २०२६: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कोपरगावकरांना दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या विविध वस्तू अल्प दरात एकाच ठिकाणी खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. नागरिकांच्या पसंतीचा ठरलेला ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सव शनिवार, दि. २४ ऑक्टोबरपासून कोपरगावातील कृष्णाई मंगल कार्यालय येथे सुरू होणार आहे. याबाबतची माहिती गौतम बँकेच्या माजी संचालिका तथा प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा पुष्पा काळे यांनी दिली.

कोपरगाव शहर व तालुक्यातील महिला बचत गटांना आर्थिक हातभार मिळावा, तसेच गृहोद्योग व छोटे व्यवसाय करणाऱ्या महिलांना त्यांच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि त्याचबरोबर नागरिकांना दर्जेदार वस्तू वाजवी दरात एकाच ठिकाणी मिळाव्यात, या दुहेरी उद्देशाने माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे व जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या पुढाकारातून गेल्या काही वर्षांपासून ‘दिवाळी हाट’ खरेदी उत्सवाचे आयोजन केले जात आहे.

दरवर्षी या ‘दिवाळी हाट’ला कोपरगाव तालुक्यासह शेजारील तालुक्यांमधूनही ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक महिला बचत गट व गृहोद्योग करणाऱ्या व्यावसायिकांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळत असल्याने या उपक्रमातून महिला उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होत आहे.

यावर्षीही शनिवार, दि. २४ ऑक्टोबर ते सोमवार, दि. २६ ऑक्टोबर या तीन दिवसांच्या कालावधीत ‘दिवाळी हाट’ आयोजित करण्यात आला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांना येथे फराळाचे पदार्थ, आकर्षक सजावटीचे साहित्य, तयार कपडे, पूजा साहित्य, विविध प्रकारचे आकाशकंदील तसेच दिवाळीसाठी आवश्यक असणाऱ्या अनेक वस्तू उपलब्ध होणार आहेत.
‘दिवाळी हाट’च्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या उत्पादनांना बाजारपेठ व विक्रीचे हक्काचे व्यासपीठ मिळते. त्याचबरोबर नागरिकांना आवश्यक वस्तू अल्प दरात आणि एकाच ठिकाणी उपलब्ध होत असल्याने खरेदीचा वेळ वाचतो. या उपक्रमातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीचा थेट फायदा स्थानिक महिला व्यावसायिक व बचत गटांना मिळणार आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यातील नागरिकांनी २४ ते २६ ऑक्टोबरदरम्यान कृष्णाई मंगल कार्यालय येथे आयोजित ‘दिवाळी हाट’ला भेट देऊन स्थानिक महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे आणि या सुवर्णसंधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेच्या माजी संचालिका चैताली काळे यांनी केले आहे.



