रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी एक आवर्तन- पालकमंत्री ना. डॉ. विखे पाटील

रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी एक आवर्तन- पालकमंत्री ना. डॉ. विखे पाटील
उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन; पाण्याची उधळपट्टी टाळण्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आवाहन
Kopargaon vijay kapse दि २४ ऑक्टोबर २०२६ : गोदावरी धरण समूहामध्ये उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी प्रत्येकी एक आवर्तन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा पर्जन्यमानात ५० टक्क्यांपेक्षा अधिक तूट असल्याने उपलब्ध पाण्याचा अत्यंत जपून वापर करावा लागणार आहे. जलसंपदा विभागाच्या या नियोजनाला शेतकरी बांधवांनी सहकार्य करून पाण्याची उधळपट्टी थांबवावी आणि टंचाईच्या संकटावर एकत्रितपणे मात करावी, असे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अंतर्गत कालवा सल्लागार समितीची बैठक ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत गोदावरी धरण समूहातील उपलब्ध पाणीसाठा, लाभक्षेत्रातील पाणीवाटप, रब्बी व उन्हाळी आवर्तनांचे नियोजन तसेच कालव्यांच्या दुरुस्ती व अतिक्रमणांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार आशुतोष काळे, आमदार हेमंत ओगले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, ‘गणेश’ कारखान्याचे माजी चेअरमन मुकुंदराव सदाफळ, शिर्डीच्या नगराध्यक्षा सौ. जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, राहाता उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, श्रीरामपूरचे नगराध्यक्ष करण ससाणे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, मोहनराव सदाफळ, नारायण कार्ले, हेमंत बोरावके, डॉ. के. वाय. गाडेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आणि उपविभागीय अभियंता विवेक लव्हाट आदी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की, मागील वर्षी याच कालावधीत ५१६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र अवघा २६१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पर्जन्यमानातील मोठी तूट लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे अत्यंत काळजीपूर्वक नियोजन करण्याची आवश्यकता आहे. ‘अल निनो’च्या आव्हानात्मक वातावरणातही धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. त्यामुळे ओव्हरफ्लोचे पाणी सुरुवातीच्या काळात लाभक्षेत्राला देता आले. मागील दोन वर्षांत जायकवाडी धरणासाठी पाणी सोडावे लागलेले नाही, ही लाभक्षेत्रासाठी दिलासादायक बाब आहे. मात्र, आता उपलब्ध पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा अचूक हिशेब ठेवणे गरजेचे आहे, असे त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पाण्याचे संकट गंभीर झाले असून अनेक महानगरपालिका व नगरपालिकांनाही पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत गोदावरी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा विभागाने नियोजन केले आहे. सध्याच्या नियोजनानुसार रब्बी हंगामासाठी एक आणि उन्हाळी हंगामासाठी एक, अशी दोन आवर्तने देण्याचे नियोजन आहे. उपलब्ध पाणीसाठा व परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
बेकायदेशीर वाळू उपशावर कारवाई
नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू उपसा हा पाण्याचा उपसा करण्याइतकाच घातक आहे. वाढत्या वाळू उपशामुळे नदीकाठ उद्ध्वस्त होत असून त्याचा परिणाम नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहावरही होत आहे. त्यामुळे आवर्तनाचे पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात, असे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
जलसंपदा विभागाने सर्वच कालव्यांवरील अतिक्रमणे हटविण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कालव्यांचे संपूर्ण अस्तरीकरण करण्यात येणार असल्याचा शेतकऱ्यांमध्ये असलेला गैरसमज चुकीचा आहे. ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या बांधकामाची आवश्यकता आहे, त्याच ठिकाणी अस्तरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीपट्टी वेळेत भरण्याचे आवाहन
दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांच्या पाणीपट्टीबाबत शासन संवेदनशीलतेने निर्णय घेत आहे. मात्र, शेतकऱ्यांनी आपली चालू पाणीपट्टी वेळेत भरावी, असे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले. लाभक्षेत्रातील विविध नगरपालिकांकडे असलेल्या पाणीपट्टीच्या थकबाकीबाबतही कायदेशीर व गांभीर्याने निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
वसूल होणाऱ्या पाणीपट्टीच्या माध्यमातूनच कालवे व वितरिकांच्या दुरुस्तीची कामे केली जातात. नाबार्डच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विशेष निधीतून कालव्यांच्या नूतनीकरणाची प्रलंबित कामे पूर्ण करण्यात येणार असल्याचेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
बैठकीत आमदार आशुतोष काळे, आमदार हेमंत ओगले आणि स्नेहलता कोल्हे यांनी लाभक्षेत्राशी संबंधित विविध मागण्या मांडल्या. नपावाडीचे विजय वहाडणे, विलास कदम, संपतराव भारुड, विजय सदाफळ, संजय काळे आदी शेतकऱ्यांनीही महत्त्वपूर्ण सूचना केल्या.
अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने यांनी धरण समूहातील उपलब्ध पाणीसाठ्याची अचूक आकडेवारी सादर करून त्याआधारे करण्यात आलेले पाणी नियोजन बैठकीत मांडले. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून रब्बी व उन्हाळी हंगामातील आवर्तनांचे नियोजन यशस्वी करण्यासाठी प्रशासनासोबत शेतकऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे.



