लोणीत रंगली ‘दिवाळी पहाट’; उदयोन्मुख कलावंतांच्या सुरेल मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोणीत रंगली ‘दिवाळी पहाट‘; उदयोन्मुख कलावंतांच्या सुरेल मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लोणीत रंगली ‘दिवाळी पहाट‘; उदयोन्मुख कलावंतांच्या सुरेल मैफलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Loni vijay kapse दि ७ नोव्हेंबर २०२६–सहकाराची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोणी येथे दीपावलीच्या मंगलमय पर्वानिमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ या संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील उदयोन्मुख गायक आणि वादक कलाकारांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून पहाटेच्या प्रसन्न वातावरणात संगीताची अविस्मरणीय मैफल रंगवली.

जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील आणि सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ‘केव्हातरी पहाटे’, ‘मातीमध्ये दरवळणारे’, ‘या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, ‘रेशमाच्या रेघांनी’, ‘घेई छंद मकरंद’, ‘स्वामी कृपा कधी करणार’ अशा विविध लोकप्रिय नाट्यगीत, भावगीत आणि भक्तिगीतांचे सादरीकरण करण्यात आले. प्रत्येक गीताला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.

संकेत दरकदार, स्नेहा निर्मळ, दीपक वाघ, दुर्गा आगाशे यांच्यासह ज्येष्ठ गिटार वादक प्रदीप अडवणकर, तबला वादक अनिल डोळे, नकुल भगत, पखवाज वादक हनुमान बैरागी आणि कीबोर्डवर नरेंद्र साळवे या कलाकारांनी मराठी संगीत विश्वातील अजरामर गीतांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. काही गीतांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला, तर भक्तिगीतांनी वातावरण भक्तिमय केले. गायकांच्या सुरेल आवाजाला वादक कलाकारांच्या उत्कृष्ट साथीची जोड मिळाल्याने संपूर्ण कार्यक्रमात संगीताचा सुरेल संगम अनुभवायला मिळाला. कार्यक्रमाच्या संयोजिका प्रज्ञा सागडे यांनी उत्कृष्ट निवेदनाद्वारे कार्यक्रम अधिकच रंगतदार केला.
विशेष म्हणजे, या कार्यक्रमात अहिल्यानगर जिल्ह्यातील स्थानिक गायक आणि वादक कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे-पाटील यांनी सर्व कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक करून जिल्ह्यातील कलावंतांच्या कलागुणांनी दिवाळीचा आनंद संगीताच्या माध्यमातून द्विगुणित करण्याचा सुंदर प्रयत्न केला असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. याप्रसंगी ट्रक वाहतूक सोसायटीचे चेअरमन नंदकिशोर राठी, किसनराव विखे, विजयराव लगड, भारत घोगरे यांच्यासह ग्रामस्थ आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



