आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश; शिंगवे येथे २२०/३३ केव्ही वीज उपकेंद्रासाठी ६.५५ हेक्टर जमीन देण्यास शासनाची मान्यता
आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश; शिंगवे येथे २२०/३३ केव्ही वीज उपकेंद्रासाठी ६.५५ हेक्टर जमीन देण्यास शासनाची मान्यता
शिर्डी-कोपरगाव एमआयडीसीसह राहाता व कोपरगाव तालुक्याला होणार लाभ; शासनाचे मानले आभार
Kopargaon vijay kapse दि २३ नोव्हेंबर २०२६– राहाता तालुक्यातील शिंगवे येथे २२०/३३ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाची ६.५५ हेक्टर जमीन महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. आमदार विवेकभैय्या कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, २३ नोव्हेंबर २०२६ रोजी याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला.

या उपकेंद्रामुळे शिर्डी-कोपरगाव एमआयडीसीसह राहाता व कोपरगाव तालुक्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम होणार आहे. शेतकरी, नागरिक आणि औद्योगिक क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार असून, वाढत्या विजेच्या मागणीची पूर्तता करण्यास मदत मिळणार आहे.

शिंगवे येथील गट क्रमांक २८७ व २८४ मधील जमीन प्रचलित रेडीरेकनर दरानुसार मूल्यांकनाची रक्कम शेती महामंडळाकडे जमा करण्याच्या अटीवर उपलब्ध करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
या निर्णयाबद्दल आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री आणि राज्य शासनाचे आभार मानले. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे, शेतकऱ्यांना दर्जेदार वीजपुरवठा मिळवून देणे आणि औद्योगिक विकासाला गती देणे या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.



